हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता तामायो पेरी याचा मृत्यू झाला आहे. ४९ व्या वर्षी अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. गोट आयलँड येथे सर्फिंग करण्यासाठी गेलेल्या तामायो पेरीवर शार्कने हल्ला केला. या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (२३ जून) दुपारी ही घटना घडली. सर्फिंग करणं अभिनेत्याच्या जीवावर बेतलं आहे.
तामायो हा एक लाइफगार्ड आणि सर्फिंग प्रशिक्षक होता. ड्युटी करताना मिळालेल्या ब्रेकमध्ये तो हवाईमधील गोट आयलँडवर सर्फिंग करायला गेला होता. तिथेच त्याच्यावर शार्कने हल्ला केला. या हल्ल्यात शार्कने त्याच्या एका हातावर आणि पायावर हल्ला केला. एका व्यक्तीने अभिनेत्याला पाहताच आपतकालीन विभागाला याबद्दल माहिती दिली. पण, अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं.
तामायोने अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. 'पायरेट्स ऑफ द कॅराबियन' या सिनेमात त्याने एका डाकूची भूमिका साकारली होती. 'ब्लू क्रश', 'चार्लीज एंजल्स: फुल थ्रॉटल' या सिनेमातही तो झळकला होता. त्याच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.