- Geetanjali Ambre"डर्टी" असो वा "कहानी 2", आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक चित्रपटात विद्या बालनने आपली वेगळी छाप सोडली आहे. चौकटीबाहेर जाणाऱ्या काही भूमिकांना रुपेरी पडद्यावर विद्याने न्याय दिला आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित बेगम जान या चित्रपटाच्या माध्यमातून विद्या पुन्हा एकदा चौकटीबाहेरील भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच निमित्ताने विद्याशी साधलेला दिलखुलास संवाद... चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तू खूप बोल्ड आणि एग्रेसिव्ह दिसते आहेस?बेगम जान ही एका कोठ्याची मालकीण आहे. जी स्वतंत्र्य विचारांची, आपल्या तत्त्वांवर आयुष्य जगणारी आहे. आयुष्यात तिला कोणाचीही गरज नाहीय. ती करत असलेल्या कामाबाबत तिला अजिबात लाज नाहीय. कोठ्यावर ती किंवा इतर मुली कोणीही आपल्या मर्जीने आले नाही आहे त्यामुळे एकदा आल्यावर आपण करत असलेल्या कामाबाबत लाज काय बाळगायची अशा विचारांची आहे. बेगम जानएवढी शक्तिशाली स्त्री मी अजून पडद्यावर किंवा खऱ्या आयुष्यात बघितली नाही. बेगम जानची भूमिका साकारणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होते?बेगम जान ही माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. बेगम जान खूप एग्रेसिव्ह होती, मी मात्र एग्रेसिव्ह नाहीय. त्यामुळे ही भूमिका साकारणे माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होते. बेगम जान कठोर नाहीय, मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम असते. मी आतापर्यंत अनेक स्ट्राँग व्यक्तिरेखा साकारल्या, मात्र ही पॉवरफूल भूमिका आहे. बेगम जानला कोणी तिच्या जागेवरून हलवू शकत नाही. त्यामुळे चित्रपटात शेवटपर्यंत या गोष्टी सांभाळणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. तुला बायोपिक आणि पॉवरफूल भूमिका साकारणे जास्त आवडते का?शक्तिशाली स्त्रियांच्या भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मला आवडतात. मी स्वत:ला खूप सशक्त स्त्री समजते. तसेच विविध क्षेत्रांतील सशक्त महिला मला नेहमीच प्रेरणा देतात. त्यामुळेच कदाचित अशा भूमिका करण्याकडे माझा जास्त कल असतो किंवा त्याभूमिका माझ्याकडे येतात. मला ज्या भूमिका अपील करतात त्या मी स्वीकारते. एखादी भूमिका साकारताना तू तिची तयारी कशी करतेस?मी चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन दिग्दर्शकाबरोबर बसते. मला स्क्रिप्ट वाचताना भूमिकेबाबत पडणारे प्रश्न मी दिग्दर्शकाला विचारते. याचे दोन फायदे होतात मला भूमिका नीट समजते, तुम्ही त्या भूमिकेला स्वीकारायला लागता आणि दिग्दर्शकाबरोबरच तुमचे ट्यूनिंग जमते. एखादा चित्रपट स्वीकारताना तू तो काय बघून स्वीकारतेस?एखाद्या चित्रपट जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा मी स्वत:ला दोन, तीन प्रश्न विचारते, मोठ्या पडद्यावर एक प्रेक्षक म्हणून मला हा चित्रपट बघायला आवडले का?, मला ही कथा प्रेक्षकांना सांगायची आहे का?, मला ही भूमिका जगायची आहे का? असे प्रश्न मी स्वत:ला विचारते. त्यानंतर माझा आणि दिग्दर्शकचा या कथेकडे बघण्याचा दृष्टिकोन एकच आहे का, हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते.बेगम जाननंतर विद्या आम्हाला काय करताना दिसणार आहे?"तुम्हारी सुल्लु" नावाच्या चित्रपटात तुम्ही मला पाहाल, ज्याचे शूटिंग पुढच्या काही आठवड्यात सुरू होईल. या चित्रपटात मी गृहिणीची भूमिका साकारणार आहे, जी नंतर लेट नाईटची रेडिओ जॉकी बनते. हा एक मस्तीवाला चित्रपट आहे.
""चौकटीबाहेरील भूमिका साकारायला आवडतात""
By admin | Published: April 12, 2017 2:47 AM