सध्या देशभरातील वातावरण श्रीराममय झालं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरी रामाच्या गजराने दुमदुमणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येत रामललाची मूर्ती प्रस्थापित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने यामध्ये खारीचा वाटा देत आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी श्रीरामावर एक सुंदर गाणं रचलं आहे. दिग्गज गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर (Aarya Ambekar) यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. 'हृदय मै श्रीराम है' असे गाण्याचे बोल आहेत. श्रोत्यांनी तर गाण्याला दाद दिलीच आहे विशेष म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) हे गाणं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. यामुळे आर्याचा आनंग गगनात मावेनासा झालाय.
श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेसाठी सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं 'हृदय मे श्रीराम है' गाणं सध्या सगळीकडेच लोकप्रिय झालं आहे. अगदी पंतप्रधानांपर्यंतही याचा आवाज पोहोचला आहे. नरेंद्र मोदींनी गाण्याची लिंक शेअर करत लिहिले,'अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण देश रामाच्या भक्तीत लीन झाला आहे. लोकांची हीच भावना सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी आपल्या सुमधुर सुरातून दर्शवली आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केल्याचं पाहून आर्या आंबेकर भावूक झाली. तिने पोस्ट करत लिहिले,'जय श्रीराम. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या कामाची एक प्रामाणिक चाहती असताना त्यांची ही पोस्ट पाहून माझे डोळे पाणावले आहेत. मी शब्दात सांगू शकत नाही पण इतका आनंद मला याआधी कधीच झाला नसेल. आमचा हा खारीचा वाटा,ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्या पर्यंत पोचला, अशी भावना मनात निर्माण झाली.'
ती पुढे लिहिते, 'प्रिय मोदीजी, तुमचे मनापासून आभार, २२ जानेवारी हा महत्वाचा दिवस आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आमचा जो हा खारीचा वाटा आहे याची तुम्ही दखल घेतलीत. देशसेवेसाठी आम्ही नेहमीच गाण्याच्या माध्यमातून तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करु. तुमचा प्रचंड आदर करते आणि तुमचा आशीर्वाद घेते.'
संदीप खरे यांनी लिहिलेलं 'हदय मे श्रीराम है' गाण्याचं संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांच्या आवाजातील हे गाणं आज सर्वांच्या ओठांवर आहे.