हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यापूर्वी, कंगना शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या विधानामुळेही चर्चेत होती. दरम्यान, आता तिने तिच्या लग्नासंदर्भात भाष्य केले आहे. यासंदर्भात बोलताना कंगना म्हणाली, आपण जेव्हा एखादे नाते पुडे नेण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा आपल्याला कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरे जावे लागते.
कुणासोबत लग्न करणार कंगना रणौत? -इंडिया टीव्हीवरील आप की अदालत कार्यक्रमात भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या लग्नासंदर्भात भाष्य केले आहे. आपल्या आजू-बाजूला होत असलेल्या नकारात्मक पब्लिसिटीचा परिणाम आपल्या लग्नावर झाला असल्याचे तिने सांगितले. कार्यक्रमात एका प्रेक्षकाने कंगनाला प्रश्न केला की, आपल्याला एखादा राजकारणी किंवा अभिनेत्याशी लग्न करायला आवडेल? यावर कंगना म्हणाली, "लग्नासंदर्भात माझे खूप चांगले विचार आहेत आणि मला वाटते की, प्रत्येकालाच जोडीदाराची आवश्यकता असते."
लोक माझं लग्न होऊ देत नाहीत - कंगना म्हणाली, "लोकांनी एवढे बदनाम केले आहे की, माझे लग्नही होऊ देत नाहीत. माझ्यावर एवढ्या कोर्ट केसेस आहेत की, जेव्हा एखाद्यासोबत लग्नासंदर्भात बोलणे सुरू होते, तेव्हा पोलीस घरी येतात... समन्स येते." यावेळी कंगना एक जुना किस्सा सांगत म्हणाली, "एकदा तर होणारे सासू-सासरेही माझ्या घरी होती आणि समन्स आले. तर हा देखील एक साइड इफेक्ट आहे." मात्र यावर, हा सर्व विनोदाचा भाग असल्याचेही ती म्हणाली.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिचा पुढचा चित्रपट 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक आदी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळावर आधारित आहे.