Join us

गोव्याच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे अस्वछता, पूजा बेदीने व्हिडिओ पोस्ट करत केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:01 PM

पूजा सध्या गोव्यातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये असून तिथली भीषण अवस्था तिने व्हिडिओद्वारे लोकांना दाखवली आहे. तिने घाणीचे साम्राज्य असल्याचे तिने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

ठळक मुद्देपूजा या व्हिडिओद्वारे सांगत आहे की, या सेंटरमध्ये लोकांना खूप चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा नाहीये. पण स्वच्छतेची अपेक्षा तर आपण नक्कीच करू शकतो.

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात आहेत. पण चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले असून लोकांना बाहेरच्या शहरात जायची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी त्यांना ऑनलाईन परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच त्या शहरात गेल्यानंतर व्यक्तीला काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहाणे सक्तीचे आहे.

अभिनेत्री पूजा बेदी खास परवानगी घेऊन तिच्या प्रियकरासोबत नुकतीच गोव्याला गेली आहे. पण गोवा शहराच्या आत जाण्याआधी पूजा आणि तिच्या प्रियकरला काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. पूजा सध्या तेथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये असून तिथली भीषण अवस्था तिने व्हिडिओद्वारे लोकांना दाखवली आहे. ती या व्हिडिओद्वारे सांगत आहे की, या सेंटरमध्ये लोकांना खूप चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा नाहीये. पण स्वच्छतेची अपेक्षा तर आपण नक्कीच करू शकतो. पाहा येथे किती घाणीचे साम्राज्य आहे. एवढेच नव्हे तर येथे बुरशी आलेली देखील दिसून येत आहे. याला आपण स्वच्छता म्हणणार का? अशा सेंटरमध्ये लोक सतत येत असतात. पण इथली अवस्था पाहून आपण आपल्या घरातच अधिक सुरक्षित आहोत असे वाटते. या सगळ्या घाणीमुळे व्हायरस पसरण्याचा धोका अधिक आहे.

पूजाने या पोस्टला कॅप्शन दिली आहे की, घाणीच्या साम्राज्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता अधिक आहे. तिने पुढे लिहिले आहे की, मी काळजीपोटी हे ट्वीट केले आहे. पण माझी पोस्ट पाहून मी सेलिब्रेटी असल्याने मी गोव्याला पोहोचू शकले याची चर्चा काही लोक करत आहेत.

पूजाने तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आम्ही गोव्याला जाण्यासाठी ऑनलाईन परवानगी मागितली होती. त्यानंतर मुंबई सोडल्यावर अनेक चेक पोस्टवर आम्हाला थांबवण्यात आले. आमची चौकशी करण्यात आली. गोव्याला पोहोचण्याआधी एका रुग्णालयात आमची कोरोना टेस्ट करण्यात आली. आता आम्ही शहरात जाण्यापूर्वी काही दिवस क्वारंटाईनमध्ये आहोत.   

टॅग्स :पूजा बेदी