पूजा भट संतापली म्हणते, आपण गणेशाची पूजा करतो आणि दुसरीकडे हत्तीची इतकी निघृणपणे हत्या करतो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:41 PM2020-06-05T12:41:21+5:302020-06-05T12:42:10+5:30
पूजा भटने हत्तीणीच्या झालेल्या हत्येवर संताप व्यक्त करत एक ट्वीट केले असून हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
केरळ येथील मलाप्पूरम येथे भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्ती मानवी वसाहतीच्या जवळ आली होती, तेव्हा स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली. काहीतरी खायला मिळेल या आशेने आलेल्या या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिने तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला.
असह्य वेदनेसह ती गर्भवती हत्ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. निलंबूर येथील वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. हत्तींना पळवण्यासाठी फटाक्यांचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही. पण या घटनेने पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का? याचा विचार नक्की करण्यास भाग पाडले आहे.
या घटनेमुळे देशभरातील लोकांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील या प्रकरणावर प्रचंड चिडले आहेत. याच घटनेच्या संदर्भात पूजा भटने एक ट्वीट केले असून हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. तिने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आपण गणेशाची पूजा करतो... पण एक हत्तीची इतकी निघृणपणे हत्या करतो. आपण हनुमानाची पूजा करतो. पण माकडांना साखळ्यांना बांधून त्यांना करामती करायला लावतो आणि आपण आनंद मानतो. आपण देवीची पूजा करतो... पण समाजातील महिलांवर लैंगिक, शारिरिक अत्याचार करतो, स्त्री भ्रुणाची पोटातच हत्या करतो.
We worship Lord Ganesha and kill and abuse elephants. We worship Lord Hanuman & get pleasure out of watching monkeys being chained & performing degrading tricks. We worship and revere female goddesses and resent strength in women,abuse,maim them & practise female infanticide. 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) June 3, 2020