मुंबई - तीन वर्षांपूर्वीचा आजचाच दिवस, ज्यादिवशी संपूर्ण देश लॉकडाऊन होता. देशातील प्रत्येक माणूस घरात होता, केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच घराबाहेर जाण्यास परवानगी होती. होय, कोरोना महामारीचा तो प्रकोप होता. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांच्या सन्मानार्थ आपण टाळ्या आणि थाळ्या वाजवून कौतुक केलं होतं. आता देश पूर्ववत सुरू झालाय, लॉकडाऊन हटलाय, कोरोनाही गेलाय, असं म्हटलं जातं. मात्र, आज तीन वर्षांनी पुन्हा एकदा कोरोना असल्याचं दिसून येतंय. कारण, बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट यांनी कोरोना पॉझिटीव्ह असल्यासंदर्भात माहिती दिली आहे.
पूजा भट्ट यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत, तीन वर्षानंतर प्रथमच मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं म्हटलंय. तुम्ही सर्वांनी मास्क परिधान करा, कोरोना अद्यापही आपल्या आजुबाजूला फिरतोय. आपण, लसीकरण केलंय तरीही कोरोना आपल्याला बाधित करु शकतो. मी लवकरच आपल्या पायांवर उभी राहून सर्वांसमोर येईल, अशी आशा करते, असे अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरवरुन म्हटलंय.
अशोक स्वेन यांनी ट्विट करुन तीन वर्षांपूर्वीच्या आजच्या दिवसाची आठवण करुन दिली होती. आजच्याच दिवशी देशभर टाळ्या आणि थाळ्या वाजवत लोकं रस्त्यावर उतरले होते, हेही त्यांनी व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे. स्वेन यांच्या ट्विटरला रिप्लाय देताना पूजा भट्ट यांनी स्वत:ला कोरोना झाल्याची माहिती दिली.
दरम्यान, कोरोना कालावधीत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये, ते बरेही झाले, पण कोरोना कालावधीत एका गायकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.