संजय दत्त, आलिया भट, आदित्य राय कपूर स्टारर ‘सडक 2’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. पण हा ट्रेलर रिलीज झाला आणि ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाला. या ट्रेलरवर लाईक्सपेक्षा डिसलाईक्सचाच भडीमार झाला. परिणमी ‘सडक 2’चा ट्रेलर सर्वाधिक नाआवडीचा बॉलिवूड ट्रेलर बनला. कारण काय तर नेपोटिजमचा मुद्दा. आलिया, आदित्य यांनी तर यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण या सिनेमाचा भाग असलेली पूजा भट हिने मात्र या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. कितीही विरोध करा, फरक पडत नाही, असे तिने ट्रोलर्सला सुनावले.
तर त्याचे झाले असे की, एका युजरने पूजा भटला टॅग करत एक ट्वीट केले. ‘पूजा भट हेटर्सची चिंता करू नकोस. 50 लाख डिसलाईक्स मिळूनही ‘सडक 2’ नंबर 1 वर ट्रेंड करतोय,’ असे ट्वीट या युरने केले. या युजरच्या पोस्टवर रिप्लाय देताना पूजाने स्माईल इमोजी पोस्ट केला. शिवाय ‘मी अजिबात चिंता वगैरे करत नाहीये. लवर्स/ हेटर्स एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपला वेळ देण्यासाठी आणि ‘सडक 2’ ट्रेंडिंगमध्ये ठेवण्यासाठी मला या दोघांनाही श्रेय द्यावे लागेल,’ असे पूजाने यावर लिहिले.
विशेष म्हणजे, हे प्रकरण केवळ पूजाच्याच प्रतिक्रियेने संपले नाही तर आलियाची आई सोनी राजदान हिला पूजाचे हे ट्वीट वाचून राहावले नाही. ‘स्मार्ट मुलगी आणि एकदम योग्य बोललीस,’ अशा शब्दांत सोनी राजदानने पूजाचे कौतुक केले.
2 लाच 84 हजार लाईक्स, 50 लाख डिसलाईक्स
11 ऑगस्ट ला ‘सडक 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला आत्तापर्यंत 2 लाख 84 हजार लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या 50 लाखांच्या घरात आहेत. ‘सडक 2’चे पोस्टर रिलीज होताच नेटक-यांनी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी लावून धरली होती. त्याचा फटका या सिनेमाच्या ट्रेलरलाही बसल्याचे दिसतेय.