Pooja Hegde at Cannes 2022: कान्स सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यावेळी दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत पूजा हेगडे, हिना खान, उर्वशी रौतेला अशा अनेकजणींनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवा. यांच्यापैकी पूजा हेगडेचा (Pooja Hegde ) कान्स डेब्यू ‘एपिक’ ठरला. पूजा हेगडेचा कान्स रेड कार्पेटवरचा प्रत्येक लुक खास ठरला. चाहत्यांनी तिच्या लुकचं कौतुक केलं. पण या परफेक्ट लुकसाठी पूजाला बराच मन:स्ताप सहन करावा लागला. होय, कान्समध्ये सहभागी होईपर्यंतच्या या प्रवासात पूजाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं.
काय आहे प्रकरण‘फिल्म कंपैनियन’ला दिलेल्या मुलाखतीत पूजानं कान्स जर्नीबद्दल शॉकिंग खुलासा केला. ती म्हणाली, कान्स 2022 रेड कार्पेटवर उतरण्याआधी माझी एक सुटकेस हरवली. माझे सगळे हेअर प्रॉडक्ट्स, मेकअप व आऊटफिट हरवले. सुदैवानं मी काही रिअल ज्वेलरी भारतातून माझ्यासोबत आणली होती. आम्ही इथे विमानतळावर पोहोचलो, तेव्हा आमच्या सर्व बॅग्स आमच्याजवळ होत्या. पण नंतर अचानक माझी एक सुटकेस हलवल्याचं मला कळलं. पण यामुळे रडत बसण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता. माझ्या मॅनेजरला तर जबरदस्त टेन्शन आलं होतं. मी म्हटलं, ठीक आहे, आधी गाडीत बसा, मग काय करायचं ते ठरवू.
माझी टीम माझ्यासोबत होती. माझ्या टीमनं मला प्रचंड सहकार्य केलं. ऐनवेळी धावपळ केली. नवे हेअर प्रॉडक्ट्स आणले, नवा मेकअप खरेदी केला. आम्हाला अगदी जेवण करण्यासाठीही वेळ नव्हता. फक्त रात्री एकचं वेळ जेवून दिवसभर आमची नुसती धावपळ सुरू होती. यातच माझ्या हेअरस्टाइलिस्टला फूड पॉझजनिंग झालं. तो फक्त बेशुद्ध व्हायचा बाकी होता. पण असं असूनही माझी हेअरस्टाईल करत होता. माझ्या टीमने मेहनत केली, धावपळ केली आणि त्यांच्याचमुळे मी कान्स सोहळ्यात सहभागी होऊ शकले.
पूजा हेगडे भारताच्या 11 सदस्यीय प्रतिनिधीमंडळात सहभागी होती. कान्स सोहळ्यात तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं.