Join us

'तांडव' चित्रपटासाठी पूजा रायबागीने घेतली अशी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 8:00 AM

‘तांडव’ सिनेमात पूजा आक्रमक महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील पूजाची भूमिका खूप वेगळी असल्याने तिला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.

ठळक मुद्देतांडव सिनेमासाठी पूजाने जुन्नरमधील विनायक खोत यांच्याकडे तब्बल एक महिना तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठी-काठीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. विनायक खोत हे मुलींना स्वसरंक्षणचे धडे देतात.

यदा कदाचित, खळी, मत्स्यगंधा आणि ललित ३०५ मधून लोकप्रिय झालेली पूजा रायबागी आता अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित ‘तांडव’ सिनेमात आक्रमक महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील पूजाची भूमिका खूप वेगळी असल्याने तिला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. तांडव सिनेमासाठी पूजाने जुन्नरमधील विनायक खोत यांच्याकडे तब्बल एक महिना तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठी-काठीचे रीतसर प्रशिक्षण घेतले. विनायक खोत हे मुलींना स्वसरंक्षणचे धडे देतात. पूजासाठी हा खूप रोमांचकारी असा अनुभव होता. विशेष म्हणजे हे शिक्षण घेण्यासाठी पूजा एक महिना त्यांच्याच गावी राहिली होती.

तांडव सिनेमात अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाबद्दल पूजा सांगते की, तांडव या चित्रपटाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ  महिला पोलीस अधिकारीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी अशी नायिका मी यात साकारते आहे. सिनेमामध्ये तिचा संघर्ष सत्तेतील राजकारण्यांशी होतो. त्याचा ती कसा सामना करते यावर आधारित चित्रपटाची कथा आहे. महिलांच्या सर्वच क्षेत्रांतील उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु पोलीस महिलांवर आधारित नायिकाप्रधान चित्रपट मराठीत क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो.

महिला दिनाचे औचित्य साधून ‘तांडव’ या मराठी सिनेमाचे पोस्टर अनघा अशोक सातवसे (पोलीस निरीक्षक, पवई) आणि प्रियांका तात्यासाहेब पाटील (पोलीस उपनिरीक्षक, पवई) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले होते. 

तांडव या चित्रपटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अॅक्शन दृश्य आहेत आणि त्यासाठीच पूजाने प्रचंड मेहनत घेतली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची कथा सुभाष गणपतराव काकडे यांनी लिहिली आहे तर पटकथा संवाद प्रशांत निगडे यांचे आहे. त्याचबरोबर रोहन पाटील, अशोक काजळे आणि नविन मोरे यांचे संगीत आहे.

 

टॅग्स :अरुण नलावडेसय्याजी शिंदे