Poonam Pandey : गेल्या दोन दिवसांपासून पूनम पांडे हे नाव चर्चेत आहे. स्वत:च्याच मृत्यूची अफवा पसरवून नंतर मी जीवंत असल्याचं सांगत तिने 'पब्लिसिटी स्टंट' केला. 'सर्व्हायकल कॅन्सर' विषयी जनजागृती पसरवण्यासाठी तिने हे नाटक केलं. उद्देश जरी चांगला असला तरी तिची पद्धत कोणालाच पटलेली नाही. दरम्यान पूनम पांडेला तिच्याच इंडस्ट्रीतून जोरदार विरोध होत असतानाच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मात्र तिला पाठिंबा दिला आहे. यामुळे ते स्वत:च ट्रोलही झाले आहेत.
मनोरंजनसृष्टीत काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत राहणाऱ्या लोकांपैकी एक राम गोपाल वर्मा यांचंही नाव आहे. त्यांनी नुकतंच पूनम पांडेचा बचाव करत एक ट्वीट केलं. ते लिहितात, "पूनम तू जनजागृतीसाठी जी पद्धत वापरलीस त्यामुळे कदाचित तुला टीकेचा सामना करावा लागेल. मात्र तुझ्या प्रामाणिक उद्देशावर कोणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. सर्व्हायकल कॅन्सर काय आहे याबद्दल सगळीकडेच चर्चा होत आहे. तुझं मन तुझ्यासारखंच सुंदर आहे. तुझ्या उज्वल आयुष्यासाठी प्रार्थना करतो."
राम गोपाल वर्मा यांनी पूनम पांडेला एकप्रकारे पाठिंबा दिल्याने आता त्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'जोपर्यंत तुमच्यासारखे महान लोक आहेत तोवर पूनम पांडे सारख्या माणसांची अशीच हिंमत होत राहील' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान पूनम पांडेच्या या कृत्यावर अख्खी इंडस्ट्री तिच्याविरोधात गेली आहे. कंगना रणौत, एकता कपूर सारख्या सेलिब्रिटींनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर उर्फी जावेद, राखी सावंतसारख्या ड्रामा क्वीन्सनेही तिला खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडियावर पूनमची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.