Join us

पॉपस्टार रिहाना आली... शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारी गायिका अंबानींच्या प्री-वेडिंग सेरेमनीला हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:05 AM

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या देशभर चर्चा आहे. या सोहळ्यासाठी दिग्गज मंडळीची उपस्थिती असून अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावत आहेत. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब गुजरातच्या जामनगरला पोहचले. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अंबानी यांच्या सोहळ्यात उपस्थिती लावली. दुसरीकडे पॉपस्टार गायिका रिहाना हिचेही या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये आगमन झाले आहे. रिहानाने शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. 

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. कोर्पोरेट आणि उद्योगविश्वाला या तीन कायद्यांचा फायदा होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी विरोध केला होता. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम होतं. या दरम्यान हॉलिवूडची गायिका आणि पॉप स्टार सिंगर रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलन समर्थनार्थ एक ट्विट केलं होतं. रिहानाच्या या ट्विटची जगभर चर्चा झाली होती. आता, त्याच पॉपस्टार गायिकेला मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या प्री-विडींग सोहळ्याच निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात रिहाना गाणंही गाणार असल्याचे समजते. त्यासाठी, ती जामनगरमध्ये दाखल झाली.  

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची देशभर चर्चा असून मुकेश अंबानी यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतानाही आपल्या मुलाच्या लग्नातील सोहळ्यात ते स्वत: नमस्कार करुन लोकांना जेवण वाढत होते. अंबानी कुटुंबांच्यावतीने ५१ हजार ग्रामस्थांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये, अंबानी कुटुंबातील सर्वच सदस्य निमंत्रितांना जेवणाच्या पंगतीत आग्रहाने जेवण देताना दिसून आले.  

दरम्यान, १ मार्च ते ३ मार्चपर्यंत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. फेसबुकचे मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे झाडून सर्व बडे बडे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.

रिहानाने काय केले होते ट्विट

रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली होती. त्यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख होता. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले होते की, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest. असे ट्विट रिहानाने कोले होते. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा झाल्याचं दिसून आलं. तर, भारतातील क्रिकेटर्सं आणि सेलिब्रिटींनीही ट्विट करुन, देशातील घटनांसंदर्भात, एकतेसंदर्भातील प्रश्न सोडवायला भारत सक्षम असल्याचं म्हटलं. तसेच, India together हा हॅश टॅगही चालविण्यात आला. 

टॅग्स :शेतकरीमुकेश अंबानीलग्नजामनगर