Join us

मराठी सुगम संगीतातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन, डॉ. सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:20 IST

मुकुंद फणसळकर यांचं पुण्यात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येतेय

मराठी भावगीत आणि सुगम संगीतातील गुणी आणि बुद्धिमान गायक अशी ओळख असणारे मुकुंद फणसळकर यांचं निधन झालंय. पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुंद यांच्या निधनाने एक उमदा गायक सोडून गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मुकुंद यांच्या निधनावर संगीतविश्वातील दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. गायक-संगीतकार-दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णींनी मुकुंद यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सलील कुलकर्णी लिहितात, "मुकुंद फणसळकर गेला.. अतिशय आवडता गायक.. एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा...आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने..बोलण्याने भारावून टाकलं होतं...त्यातलं एक महत्त्वाचं नाव …. खूप खूप वाईट वाटलं.. प्रीतरंग , साजणवेळा , नॅास्टॅस्जिया …. सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या.. एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.."

याशिवाय मुकुंद यांच्यासोबत संगीतप्रवासाची सुरुवात करणारे त्यागराज खाडिलकर लिहितात की, "आणि आज तो गेला.. मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली.. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम.. रसिकांनी आम्हा दोघांनाही उमेदीचे तरुण गायक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं!.. त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती.. यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या सदैव स्मरणात राहशील मित्रा.. आमच्या स्मरण यात्रेत..!!"

टॅग्स :सलील कुलकर्णीसंगीतमराठी