Join us

"काला करिकालन"चे पोस्टर रिलीज, रजनीकांत पुन्हा डॉनच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 3:19 PM

दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी "काला करिकालन" चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 25 - दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी "काला करिकालन" चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला असून, काळया आणि लाल रंगातील हा पोस्टर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेतो. रजनीकांत यांचा जावई धनुष या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यानेच या चित्रपटाचे पोस्टर आज सकाळी टि्वटरवर पहिल्यांदा पोस्ट केले. रजनीकांत पुन्हा एकदा या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार असून, पा रंजीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी रजनीकांत यांचा कबाली चित्रपट पा रंजीतने दिग्दर्शित केला होता. 
 
या चित्रपटात रजनीकांत यांच्यापेक्षा 36 वर्षांनी लहान असलेली हुमा कुरेशी त्यांची नायिका असेल.  संतोष नारायण चित्रपटाला संगीत देणार असून, 28 मे पासून चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तामिळ, तेलगु, हिंदी आणि इंग्रजी भाषेत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. 
 
काही दिवसांपूर्वी या चित्रपटावरुन वाद झाला होता. हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखरने रजनीकांत यांना नोटीस पाठवली होती. आपल्या वडिलांना डॉन आणि स्मगलर म्हणून दाखवू नये अशी त्याने मागणी केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा हाजी मस्तानच्या जीवनाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.  दरम्यान रजनीकांत सध्या त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करु नये यासाठी विरोधकांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी रजनीसमर्थकांनी मोर्चा काढला होता. 
 
सध्याच्या परिस्थितीत राज्यव्यवस्था लोकांचा विचार करत नाहीय. हे चित्र बदलले पाहिजे. तुमच्यासारख्याच माझ्यावर जबाबदा-या, काम आहे. आपण आपले काम करत राहू पण जेव्हा वेळ येईल तेव्हा युद्धासाठी तयार रहा असे रजनी आपल्या समर्थकांना म्हणाले होते. या दौ-यात त्यांनी नाव न घेता द्रमुकवरही टीका केली होती. त्यानंतर रजनी यांच्या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 
 
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्यामध्ये आहे.