Join us

जेजे रुग्णालयात नितीन देसाईंचे शवविच्छेदन; प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 8:56 AM

नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली.

मुंबई: भव्यदिव्य कलाकृतींनी रुपेरी पडद्यावर अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या मृत्यूनं संपूर्ण सिनेमासृष्टी हळहळली आहे. 

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यावेळी बोलवण्यात आले. तसेच डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते. जे जे रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.

घटनास्थळावर आढळलं धनुष्यबाणाचं चिन्ह?; नेमका काय आहे अर्थ

नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. देसाईंना आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. त्या त्यांनी परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. 

कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे त्यांनी क्लिपमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठविल्याचे समजते. 

दरम्यान, नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. २००५ साली  हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईबॉलिवूडसिनेमा