Adipurush Release Date: ओम राऊतने प्रभास ( Prabhas ) व सैफ अली खानला (Saif Ali Khan) घेऊन ‘आदिपुरूष’ (Adipurush) हा सिनेमा बनवण्याची घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गेल्या महिन्यात नवरात्रीच्या मुहूर्तावर मेकर्सनी ‘आदिपुरूष’चा टीझर रिलीज केला. पण हा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता निराशेत बदलली. लोकांनी टीझरला जबरदस्त ट्रोल केलं. सिनेमातील रावण व हनुमानाचा लुक लोकांच्या पचनी पडला नाही. सिनेमातील व्हिएफएक्स दृश्यांवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली. सिनेमातील कलाकारांची निवडच चुकली, असं म्हणत अनेकांनी या मेकर्सला नको ते ऐकवलं. अनेकांनी ‘सगळ्यात महागडा कार्टुन शो’ म्हणत टीझरची मजा घेतली. ‘आदिपुरूष’ अशा नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, ‘आदिपुरूष’चं प्रदर्शन लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
500 कोटी बजेटच्या ‘आदिपुरूष’साठी 12 जानेवारी 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आल्याचं कळतंय. 12 जानेवारीऐवजी पुढील वर्षी उन्हाळ्यात हा सिनेमा रिलीज करण्याचा मेकर्सचा विचार असल्याचं कळतंय. अर्थात मेकर्सनी अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
म्हणून बदलला रिलीजचा प्लान?‘आदिपुरूष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ओम राऊतच्या या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्टवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. चर्चा खरी मानाल तर, मेकर्स आता व्हीएफएक्सवर नव्याने काम करू इच्छितात, त्यामुळे ‘आदिपुरूष’ लांबणीवर टाकण्याचा त्यांचा विचार आहे. एका रिपोर्टनुसार,‘आदिपुरूष’ पोस्टपोन करण्यामागे वेगळंच कारण आहे. जानेवारीत संक्रांती वीकेंडला चिरंजीवी स्टार ‘वाल्टेयर वेरैय्या’ आणि नंदमुरी बालकृष्ण याचा ‘वीरा सिन्हा रेड्डी’ हे दोन सिनेमे रिलीज होत आहे. या दोन सिनेमांमुळे ‘आदिपुरूष’ला आंध्र व तेलंगाणात फार स्क्रीन्स मिळणार नाही, अशी भीती मेकर्सला आहे. त्यामुळे हा ट्रिपल क्लॅश टाळण्यासाठी ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट पुढे ढकलल्याची चर्चा आहे. आता खरं काय ते लवकर कळेलच.
‘आदिपुरूष’ चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास लीड रोलमध्ये आहे. त्याच्याशिवाय सैफ अली खान, अभिनेत्री क्रिती सनॉन, अभिनेता देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.