बाहुबली स्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' च्या यशानंतर भाव वधारला आहे. बाहुबली सुपरहिट झाल्यानंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. 'साहो', 'राधेश्याम','आदिपुरुष' हे तीनही सिनेमे जोरदार आपटले. यानंतर गेल्या वर्षी आलेल्या 'सालार'ने प्रभासचं बुडतं करिअर वाचवलं. आता या पॅन इंडिया सुपरस्टारवर तब्बल 1300 कोटींचा दाव लागला आहे. प्रभास आगामी 4 सिनेमांमध्ये झळकणार आहे. या चारही सिनेमांचं एकूण बजेटच 1300 कोटी आहे.
Kalki 2898 AD हा बहुप्रतिक्षित चित्रपट त्यापैकीच एक. हा अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट असून सायन्स फिक्शन पौराणिक कथेवर आधारित आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्किच्या रहस्यमय जीवनाभोवती फिरणारी कहाणी आहे. 2020 मध्ये प्रोजेक्ट K म्हणून आधी सिनेमाची घोषणा झाली होती. मात्र कोरोनामुळे सिनेमाचं काम लांबणीवर पडलं.
सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पाटनी, उलगनायगन कमल हसन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय राजेंद्र प्रसाद,पसुपति, सास्वता चॅटर्जी, अन्ना बेन सहाय्यक भूमिकेत आहेत. सिनेमाचं एकूण बजेट 600 कोटींवर गेलं आहे. नाग अश्विनने सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अश्विनी दत्त यांनी निर्मिती केली आहे. संतोष नारायण साऊंडट्रॅक तयार करत आहेत. हा सिनेमा आधी 9 मे रोजीच प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या निवडणुकांमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
आगामी 'द राजा साब' या सिनेमातही प्रभास दिसणार आहे. हा रोमँटिक हॉरर थ्रिलर असणार आहे. मारुती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात निधी अग्रवाल, मालविका मोहनन, योगी बाबू यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं बजेट 100 कोटी आहे. डिसेंबर 2024 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचा प्लॅन आहे.
प्रभासचा 25 वा सिनेमा 'अॅनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत असणार आहे. 'स्पिरीट' असं सिनेमाचं टायटल आहे. संदीप रेड्डी वांगा आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. अॅक्शन आणि व्हॉयलेन्स सिनेमात असणार आहे.सिनेमाचं बजेट 300 कोटी असणार आहे. डिसेंबरमध्ये शूट सुरु होणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच प्रभासचा सालार 2 सुद्धा रांगेत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार'चा हा सीक्वेल असणार आहे. लवकरात लवकर शूट सुरु करुन पुढील वर्षी सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आहे. सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन , श्रुती हसन, जगपति बाबू यांचीही सिनेमात भूमिका आहे.