ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमात अभिनेता प्रभासने (Prabhas) प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली. खरंतर या सिनेमाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या मात्र झालं उलटंच. चित्रपटाचं व्हीएफएक्स तर गंडलंच पण सिनेमातील डायलॉग्स, कलाकारांचे लुक्स सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादांवरुन तर गदारोळच झाला. प्रभासही श्रीरामाच्या भूमिकेत फारसा पसंतीस पडला नाही. हा वाद ताजा असतानाच आता आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटात प्रभास भगवान विष्णूच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
नाग अश्विन आगामी 'प्रोजेक्ट के' सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. मार्व्हलच्या धर्तीवर सायन्स फिक्शन, फँटसी, सुपनॅचरल आणि एक्शन फिल्मने परिपूर्ण असा हा सिनेमा असणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय अशी एक साधी कहाणी आहे. मात्र त्याला फँटसीची जोड देण्यात आली आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णू दुष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेतात. अभिनेता प्रभास या युगातील भगवान विष्णूचा अवतार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा अवतार एक मॉडर्न हिरोच्या रुपात आहे जो मॉडर्न हत्यारांचा वापर करुन दुश्मनांशी चार हात करणार आहे. थोडक्यात काय तर आधुनिक काळातील भगवान विष्णूची भूमिका प्रभास साकारणार आहे.
नाग अश्विन यांनी मार्व्हलच्या चाहत्यांना प्रभावित केलं आहे. त्यांना सिनेमा नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. पण आता 'आदिपुरुष'च्या वादामुळे प्रभासला आणखी एका पौराणिक भूमिकेत बघायला प्रेक्षक तयार असतील का हा प्रश्नच आहे. सिनेमात प्रभास शिवाय अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन, सूर्या, दिशा पटानी यांचीही भूमिका आहे.