प्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक प्रदीप सरकार (Pradeep Sarkar) यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झालं आहे. ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूड फिल्ममेकर हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी ट्वीट करत त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक हरपला आहे.
प्रदीप सरकार डायलिसिसवर होते. त्यांच्या शरिरात पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले होते. तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फिल्ममेकर आणि त्यांचे जवळचे मित्र हंसल मेहता यांनी प्रदीप सरकार यांचा फोटो पोस्ट केला आहे. श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी लिहिले, 'प्रदीप सरकार. दादा. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.'
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी अनेक हिट सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 'परिणीता' सिनेमा त्यांनीच दिग्दर्शित केला होता. याशिवाय 'लागा चुनरी मे दाग', 'हेलिकॉप्टर इला', 'मर्दानी', 'लफंगे परिंदे' असे हिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. ते लवकरच पालक आणि मुलांच्या पिढीतील अंतर या विषयावर फिल्म घेऊन येणार होते. बॉलिवूडच्या टॉप दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना होते. ते फक्त दिग्दर्शकच नाही तर प्रतिभावान लेखकही होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांनी अॅडव्हरटायझिंग क्षेत्रात काम केले होते.
आज संध्याकाळी ४ वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.