>> देवेंद्र जाधवगेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात एक विषय चांगलंच गाजला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या विधानावरुन मोठा वादंग निर्माण झाला. सुरेश धस यांनी "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” हे वक्तव्य केल्याने प्राजक्ता माळीला लोकांच्या नाराजीच्या सामना करावा लागला. पुढे प्राजक्ताने शनिवारी (२८ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन तिला झालेल्या त्रासाचा खुलासा केला.
याशिवाय सुरेश धस, करुणा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली.सुरेश धस यांनी नुकतीच प्राजक्ता माळीची जाहीर माफी मागितली. याशिवाय प्राजक्तानेही सुरेश धस यांनी माफी मागितल्यावर हे प्रकरण पुढे वाढवू नये असा खुलासा करत, सर्व गोष्टींवर पडदा पाडला. या संपूर्ण घटनेवर लोकमत फिल्मीने 'महाराष्ट्राच्या राजकारणात महिला कलाकारांना टार्गेट केलं जातंय का? राजकारण्यांनी बोलताना भान ठेवावं का?' असा प्रश्न अभिनेत्रींना विचारला. 'टार्गेट करणं कोणालाही चुकीचंच!', असं मराठी अभिनेत्रींंचं मत आहे. अभिनेत्रींनी दिलेली मतं पुढीलप्रमाणे;
ऐश्वर्या नारकर- माणसाने माणसाचा मान ठेवला पाहिजे
हे जे चाललंय ते मुळापासून मला माहित नाहीये. त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे कारण ती गोष्ट मला डिटेलमध्ये माहित नाहीये. पण टार्गेट कोणीच कोणाला करु नये. कोणी कोणाला टार्गेट करत असेल तर ते चुकीचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला प्रत्यक्ष घटना काय घडलीये, किंवा कोण कोणाला काय बोललंय याचा काहीच अंदाज नसतो. आणि मग त्याचे कानगोष्टींसारखे वेगळेच अर्थ निघतात. आणि मग हे अर्थ बदलत जाऊन ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे कोणाला टार्गेट करुन अशा गोष्टी करु नये ज्या मानसिक आणि शारीरिक दृष्टीने खूप त्रासदायक आणि जिव्हारी लागण्यासारख्या असतील.
कलाकारांच्या बाबतीत किंवा राजकारण्यांच्या बाबतीत असं नाही तर मला असं वाटतं कोणीही कोणाहीबाबतीत बोलताना विचार करूनच बोललं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या माणसाबद्दल कोणतीही कमेंट करायची असेल किंवा मत व्यक्त करायचं असेल तर ते विचारपूर्वकच केलं पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य आहे पण आपण दुसऱ्याच्या आयुष्याचा अधिकार घेतलाय असं नाही होत.
त्यामुळे एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तरी आपली जी संस्कृती आहे, किंवा आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत त्याप्रमाणेच केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की एक माणूस म्हणून दोन माणसांमधलं हे इक्वेशन असलं पाहिजे. कारण एक आर्टिस्ट असू दे, राजकारणी असू दे किंवा कॉमन मॅन माणसाने माणसाचा मान हा ठेवलाच पाहिजे.
नम्रता संभेराव: भाषा जपून वापरली पाहिजे
मला पर्सनली अनुभव नाही आला या सगळ्याचा. प्राजक्ता माळीचं प्रकरण मोठं झाल्याने ही गोष्ट बाहेर पडली. कारण आता तिने रोखठोकपणे एवढं सांगितलंय, तिने पत्रकार परिषद घेतली त्यामुळे त्रास हा नक्कीच झाला असणार. त्यामुळेच तिने हे केलंय. माझ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही, किंवा मला कधी असा त्रास झाला नाही. पण तिच्याबद्दल जे झालंय ते निषेधार्थ आहे, एवढंच मी सांगू शकते. जे झालंय ते चुकीचं झालंय.
सगळ्यांनी भाषा ही जपून वापरली पाहिजे.कारण प्रत्येकजण एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतो. फॅमिली असते आपली. कारण याचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या कुटुंबावर होत असतो. आपण जरी या इंडस्ट्रीत असलो तरी आपल्या कुटुंबातील माणसं साधी, सामान्य असतात. त्यामुळे या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होतो. त्यामुळे राजकारण्यांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने जपून बोललं पाहिजे. प्रत्येकाने भाषा जपून वापरली पाहिजे.
कारण आपल्या मराठी भाषेचे खूप सारे अर्थ निघतात. कुठेतरी काहीतरी फोटो दिसला आणि त्यावरुन लोकांनी जे अर्थ काढले त्याच्यावरून प्राजक्ताला झालेला हा त्रास आहे. मला असं वाटतं की, या पद्धतीने हे समोर नव्हतं यायला पाहिजे. जसं प्राजक्ता बोलली की लोकप्रतिनिधींना फॉलो करणारे अनेकजण असतात. सामान्य जनतेला काही या गोष्टीचं ज्ञान नसतं. त्यामुळे लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे बोलताना भान ठेवलं पाहिजे एवढं नक्की!
अश्विनी महांगडे: प्राजक्ताच्या पाठीशी उभं राहाणं आवश्यक
प्राजक्ता माळीच्या विषयावर बोलायचं झालं तर ऑफकोर्स टार्गेट केलं जातंय. कारण कलाकार कुठल्यातरी इव्हेंटला जातात. त्याचे फोटोज तुम्ही व्हायरल करता आणि ते वेगळ्याच पद्धतीने दाखवता तर ही निषेध नोंदवणारीच गोष्ट आहे. त्यामुळे अर्थात टार्गेट केलं जातंय. एकतर मुंडेंना टार्गेट करण्याचा त्यांचा त्यांचा हा मुद्दा होता खरंतर. त्याच्यात हे परळी पॅटर्न, रश्मिका आणि बर्याच कलाकारांचं नाव घेतलं.
जसं कुशल बद्रिके म्हणाला तसं पुरुष कलाकारही गेलेले तिथे पण त्यांचे फोटो व्हायरल नाही केले. प्राजक्ताला तुम्ही कसं करता. मला फार कौतुक वाटतं त्या पोरीचं, 'फुलवंती'सारखा प्रोजेक्ट तिने करुन दाखवला. फिल्म रिलीज होईपर्यंत कशी प्रोसेस असते किती त्रासदायक आहे.. त्यामुळे हे करु नये एवढंच!
मला कायम असं वाटतं की, राजकारणीच नाही तर माणसांनीच बोलताना भान ठेवावं. आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय, कोणाच्या चारित्र्यावर आपण बोलतोय तर ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. राजकारणी लोक जी आपल्यासाठी काम करतात तर त्या लोकांनी तर भान ठेवलंच पाहिजे. या परिस्थितीत पुढे बदल असा नाही होणार. आता प्राजक्ताला बरेच कलाकार सपोर्ट करत आहेत. एकमेकांचा हात धरून जेव्हा तिच्या पाठीशी तुम्ही उभे राहाल तेव्हाच काहीतरी होऊ शकतं. म्हणजे तिच्याविषयी पोस्ट तर मी पण नाही केलीय.
चार-दोन लोक मला भेटल्यावर मला प्राजक्ता माळीच्या प्रकरणाविषयी विचारतात. पण मुळात हे प्रकरण नाहीच आहे. ती खूप गुणी अभिनेत्री आहे. ती स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्या हातात सोशल मीडिया आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गाने कमेंट्स करुन जी सेंन्सिबल लोक आहेत ते सांगत आहेत की ,आम्ही प्राजक्ताच्या बाजूने उभे आहोत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
मेघा धाडे- महिलेच्या बाबतीत बोलताना तोंड सांभाळूनच बोलावं
जे आता झालंय जे चुकीचंच आहे. जाणूनबुजून टार्गेट केलंय जातंय असं काही नाहीये. पण ते अनावधानाने किंवा अगदी ते सहज बोलून गेलेत कोणताही विचार न करता. आपण म्हणतो ना की, कधीही कोणताही शब्द विचारपूर्वक बोलला गेला पाहिजे. ते तुमच्या प्रगल्भ असण्याचं लक्षण आहे. ती प्रगल्भता दिसली नाही. या वक्तव्याला फार काही प्राधान्य नाही दिलं गेलं पाहीजे. हा प्रश्न होता स्त्रीच्या अस्मितेचा. त्यामुळे जे चुकलं आहे त्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त केलंच पाहिजे. यापुढे कोणीही कलाकाराबाबतीत बोलेल त्यावर त्याने शंभर वेळा विचार केला पाहिजे की, याचे परिणाम काय होतील.
जसं तुमच्या बायका मुलांचा, सुनांचा आदर आहे तसाच रिस्पेक्ट तुम्ही इतरही बायकांच्या बाबतीत ठेवलाच पाहिजे. कुठल्याही महिलेच्या बाबतीत बोलताना तुम्ही तोंड सांभाळूनच बोललं पाहिजे.हे अमेरिका नाहीये. त्यामुळे तुम्ही जे बोलता ते पटकन उचललं जातं. त्यामुळे आपलं कल्चर इतकंही पुढारलेलं नाहीये. तथ्य नसलेल्या गोष्टीतही तथ्य शोधण्याचा लोक प्रयत्न करतात. हे एका पुरुषाबद्दल बोललं गेलं तर लोक इतकं टार्गेट नाही करत. पण स्त्रिला त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात.
आपण स्त्रियांचा मान राखण्याबद्दल भाषणात बोलतो पण प्रत्यक्ष जीवनात आपण असं काही करत नाही. आपण रोज तिची हेटाळणी करतो, तिला तुच्छ लेखतो. तिच्या नावाचा उपयोग करुन काहीतरी चुकीची विधानं करतो. महिला कलाकारांचा, महिला नेत्यांचाही चुकीच्या गोष्टींमध्ये उल्लेख केला जातो हे अत्यंत चुकीचं आहे.
क्षेत्र कुठलंही असो, फक्त कलाक्षेत्र नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये मान मिळायलाच हवा. तुम्ही एकीकडे बोलता की समानता पाहिजे. पण ती समानता अजूनतरी झालेली नाहीये. लोकांच्या मानसिकतेत ती अजून झाली नाहीये. जेव्हा महिला धडपड करुन पुढे येतात, पुढे त्यांना मिळणारी लोकप्रियता एका रात्रीत येत नाहीये. त्यामागे अहोरात्र कष्ट असतात मग ओळख होते. ही ओळख मिळाल्यावर याचा अर्थ असा नाही की, आम्ही रस्त्यावर तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. तुम्ही काहीही बोलाल आणि निघून जाल.
उलट तुम्ही कौतुक केलं पाहिजे त्या गोष्टीचं. तुम्ही सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. पण याचा उलट अर्थ निघतो. यांची किंमत अशी चुकवावी लागते की, तुम्ही टिकेला सामोरं राहिलं पाहिजे. का? आम्ही कौतुकास पात्र आहोत. प्राजक्ताने कोणाचं काय बिघडवलं होतं? तिच्या वाटेला का आली ही बदनामी. हे नाही झालं पाहिजे.
अशाप्रकारे मराठी अभिनेत्रींनी या सर्व प्रकरणावर त्यांचं मत रोखठोकपणे मांडलं आहे. प्राजक्ताच्या बाजूने यानिमित्ताने संपूर्ण इंडस्ट्री उभी राहिली आहे. यापुढे अशा काही घटना घडणार नाहीत आणि परिस्थिती सुधारेल.. अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.