...आणि 'त्या' एका चुकीमुळे प्राजक्ताने गमावली संजय लीला भन्साळींची मालिका, म्हणाली, "ऑडिशनच्या वेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 12:17 PM2024-01-07T12:17:49+5:302024-01-07T12:18:30+5:30
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टमध्येही प्राजक्ताची वर्णी लागणार होती. पण, अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे मोठा प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करून प्राजक्ता सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. मालिका आणि चित्रपटांत काम केलेल्या प्राजक्ताला 'जुळून येती रेशीमगाठी'मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतरही अनेक चांगले प्रोजेक्ट प्राजक्ताच्या हाती लागले. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या प्रोजेक्टमध्येही प्राजक्ताची वर्णी लागणार होती. पण, अभिनेत्रीच्या एका चुकीमुळे मोठा प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं आहे.
अनेकांची क्रश आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री असलेल्या प्राजक्ताने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात प्राजक्ताने अनेक ऑडिशन्स दिल्या. कलाविश्वातील करिअरबाबत 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने भाष्य केलं. यावेळी तिने संजय लीला भन्साळींच्या एका हिंदी मालिकेसाठीही ऑडिशन दिल्याचा खुलासा केला. ती म्हणाली, "सरस्वतीचंद्र या संजय लीला भन्साळींच्या हिंदी मालिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये ते ऑडिशन होतं. सकाळी मी ७ वाजताच्या एशियाडने ऑडिशनसाठी निघाले होते. पण, तिथे गेल्यानंतर मी हे काय घालून आले आहे, असं झालं. कारण, तिथे ऑडिशनसाठी आलेल्या बाकीच्या मुली थेट स्वर्गातून खाली उतरल्यासारख्या तयार झालेल्या होत्या."
"त्या सगळ्यांमध्ये मी अत्यंत गबाळी दिसत होते. फायनल ३ साठी ते ऑडिशन होतं आणि त्यासाठी फक्त १०-१२ मुलींचीच निवड केली होती. ज्यामध्ये मी होते. त्या भूमिकेसाठी घागरा वगैरे घालून ऑडिशन घेतलं गेलं होतं. हिंदीचा प्रेक्षकच वेगळा आहे. तिथे गेल्यावर मला समजलं की तुम्ही इथे एशियाडमधून वगैरे उतरून नाही येऊ शकत. साडेतीन चार तास प्रवास करून अशा अवस्थेत मी ऑडिशनसाठी नाही जाऊ शकत. यानंतर मी माझ्यात बदल केला," असंही प्राजक्ताने मुलाखतीत सांगितलं.
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताला २०११ साली सुवासिनी मालिकेतून पहिला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली. अनेक सिनेमांतही प्राजक्ताने विविधांगी भूमिका साकारल्या. 'पांडू', 'खो-खो', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह', 'चंद्रमुखी', 'संघर्ष' अशा सिनेमांत ती झळकली.