Join us

एका महिन्यातच प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' ओटीटीवर प्रदर्शित, इथे पाहता येईल पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:21 IST

११ ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. 

प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असलेल्या 'फुलवंती' सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या सिनेमातील प्राजक्ताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. तर तिच्या नृत्याने चित्रपट बहरला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच 'फुलवंती'मधील गाणी प्रचंड हिट झाली होती. आता प्राजक्ताचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. 

११ ऑक्टोबरला प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाला सुरुवातीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमाला फार चांगली कामगिरी करता आली आहे. कदाचित त्यामुळेच 'फुलवंती' सिनेमा अवघ्या महिन्याभरातच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये 'फुलवंती' पाहता न आलेल्या चाहत्यांना आता प्राजक्ताचा हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. 

कुठे आणि कसा पाहता येईल 'फुलवंती'? 

'फुलवंती' सिनेमा प्रदर्शनानंतर महिन्याभराने ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी अॅपवर रिलीज करण्यात आला आहे. मात्र हा सिनेमा सध्या रेंटवर आहे. म्हणजेच प्राजक्ता माळी 'फुलवंती' ऑनलाईन पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही पैसे मोजावे लागणार आहेत. अॅमेझॉन प्राइमवर 'फुलवंती' पाहण्यासाठी १४९ रुपये मोजावे लागतील. 

'फुलवंती'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच प्राजक्ताने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. तर स्नेहल तरडेंनी या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर स्नेहल तरडे, प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील काही कलाकारही 'फुलवंती' सिनेमात झळकले आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता माळीगश्मिर महाजनीसिनेमा