Join us

सुरेश धस यांच्यावर कारवाई होणार ? प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगानं घेतली दखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:26 IST

प्राजक्ताच्या तक्रारीची महाराष्ट्र महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे.

Prajakta Mali Suresh Dhas Controversy : भाजपा आमदार सुरेश धस (Bjp Mla Suresh Dhas) यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे", असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्याआधी करुणा शर्मा यांनी एका प्रकरणात प्राजक्ताचं नाव घेतलं. यावर अखेर प्राजक्ताने मौन सोडलं. काल पत्रकार परिषद घेत प्राजक्तानंं सुरेश धस आणि करुणा मुंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्राजक्ताने कठोर पाऊल उचलत सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे  (Woman Commission) तक्रार नोंदवली होती. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे. 

प्राजक्ताच्या तक्रारीची महाराष्ट्र महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल", असा इशारा त्यांनी दिलाय. 

पुढे त्यांनी म्हटलं, "महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत. काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत, म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे, याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल".

काल प्राजक्तानं सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. ही मागणी मात्र धस यांनी धुडकावून लावली आहे.  प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर धस यांनी म्हटलं,  "संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणाची तरी कोंडी झालेली आहे. ती फोडण्यासाठी काही क्लुप्त्या केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद घेतली गेली". सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर आता प्राजक्ताच्या तक्रारीवर महिला आयोग काय कारवाई करतो, हे लवकरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसुरेश धसरुपाली चाकणकरमहाराष्ट्र राज्य महिला आयोग