कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत.
या संकटामध्ये अभिनेता प्रकाश राज अनेकांना मदत करत आहे. आता त्याने ३१ मजदूरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली आहे. सध्या सरकारकडून मजूरांना आपापल्या गावी परतण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रकाश राजने स्थानिक प्रशानसाच्या मदतीने ३१ मजूरांची परत जाण्याची व्यवस्था केली आहे.
प्रकाश राजने ट्वीट करून याबाबत स्वतः माहिती दिली आहे. प्रकाश राजने ट्वीट करत सांगितले आहे की, काही मजूर लॉकडाऊनमुळे माझ्या फार्म हाऊसवर अडकले होते. या ३१ मजूरांची घरी परतण्याची व्यवस्था करण्यात आली असून या या मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात एक वेगळाच आनंद मिळाला. ही तर एक सुरुवात आहे... आपल्याला सगळ्यांना मिळून अनेक मजूरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे.
प्रकाश राजने काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार दिला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली होती. त्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची परवानगी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज समाजोपयोगी अनेक कामं करत आहे. प्रकाश राज अनेक लोकांची दररोज जेवण्याची व्यवस्था करत असून अनेकांना त्याने धान्यं दिली आहेत.