साऊथ इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj ) हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. सामाजिक व राजकीय मुद्यांवर ते परखडपणे मत मांडतात. भाजपचे टीकाकार म्हणून ते ओळखले जातात. अनेकदा भाजपविरोधात भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना लक्ष्य केलं आहे. इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे. लोकांनी स्थानिक भाषांना पर्याय म्हणून इंग्रजीत बोलण्याऐवजी हिंदीला प्राधान्य दिलं पाहिजे. ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलली जात नाही त्यांनी त्यांच्या राज्यातील भाषेनंतर इंग्रजीऐवजी हिंदी बोलण्यावर भर द्यावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं नुकतंच केलं. त्यांच्या नेमक्या याच वक्तव्यावर प्रकाश राज यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह यांच्या भाषणाची एक क्लिप शेअर करत, प्रकाश राज यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. ‘आमची घरं तोडण्याचे प्रयत्न बंद करा गृहमंत्री साहेब. आम्ही तुम्हाला बजावून सांगतोय की, आमच्यावर हिंदी थोपणं बंद करा. आम्ही आमच्या देशातील विविधतेवर प्रेम करतो. आमचं आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. आम्ही आमच्या ओळखीवर प्रेम करतो...,’असं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. प्रकाश राज यांनी आजवर अनेक भाषेतील चित्रपटात काम केलं. प्रकाश कन्नड भाषिक असले तरीही त्यांनी आजवर तमिळ, तेलगू, हिंदी भाषेत काम केलं आहे. या शिवायही अनेक भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे. याआधी दिग्गज गायक ए. आर. रेहमान यांनी शाह यांच्या वक्तव्यावर अशीच तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘तमिळ आमच्या अस्तित्वाचं मूळ आहे,’अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं.