साऊथचा सुपर ‘व्हिलन’ प्रकाश राज (Prakash Raj ) यांनी पडद्यावर केवळ खलनायक साकारला नाही तर अनेक विनोदी व्यक्तिरेखाही साकारल्या. त्यांच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. ‘सिंघम’ सिनेमात त्यांनी साकारलेला जयकांत शिक्रे तर विसरणे शक्यच नाही. प्रकाश राज हे आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. राजकीय मुद्यांवरही ते अगदी ठामपणे मतं मांडताना दिसतात. ते सातत्याने राजकीय विषयांवर ट्वीट करून भाष्य करत असतात.
प्रकाश राज यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे, जगभर त्यांचे चाहते आहेत, साऊथचे सुपरस्टार म्हणून ते ओळखले जातात. पण याच प्रकाश राज यांच्यासोबत आताश: अनेक लोक काम करायला घाबरू लागले आहेत. खुद्द प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला. माझ्या राजकीय विचारधारेचा आता माझं काम आणि माझ्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागला आहे, असं ते म्हणाले.
काय म्हणाले प्रकाश राज?काही लोक आता माझ्यासोबत काम करू इच्छित नाही. माझ्यासोबत काम करू नका म्हणून त्यांना कुणी थांबवलेलं नाही. तर ते घाबरतात. माझ्यासोबत काम केल्यानं काही विशिष्ट लोक दुखावले जातील, याची त्यांना भीती आहे. अर्थात यामुळे मला जराही फरक पडत नाही. मी इतका बलवान व श्रीमंत आहे की, मी सगळं काही सहन करू शकतो, असं प्रकाश राज म्हणाले.
पुढे ते म्हणाले, माझ्या राजकीय भूमिकेमुळे, राजकारणामुळे माझ्या कामावर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो आहे. काही लोक माझ्यासोबत काम करायला घाबरत आहेत. मला पर्वा नाही. यामुळे मी बोलणं थांबवणार नाही. मी बोललो नसतो तर फक्त एक चांगला अभिनेता म्हणून मेलो असतो. लोकांनी मला एक माणूस म्हणून नाही तर केवळ मला एक अभिनेता म्हणून लक्षात ठेवलं असतं. मी ठाम मतं मांडतो आणि हो, या सगळ्याची किंमतही मोजतो. इंडस्ट्रीत असे अनेक लोक आहेत, जे तोंड बंद करून राहतात आणि त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. अनेक कलाकार अद्याप शांत आहेत. मी त्यांना दोष देत नाही. कारण ते बोलणं त्यांना महाग पडू शकतं, असंही ते म्हणाले.
प्रकाश राज हे कायम केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. प्रकाश राज यांनी 2019 मध्ये बंगळुरूमधून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. प्रकाश राज यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच त्यांची ‘मुखबीर’ ही वेबसीरिज रिलीज झाली. याआधी त्यांनी मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्व्हन 1’ भूमिका साकारली होती.