दाक्षिणात्यच सिनेमे नव्हे तर बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणजे प्रकाश राज.प्रकाश राज यांनी आजवर विविध सिनेमांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रकाश राज राजकीय - सामाजिक परिस्थितीवर त्यांचं परखड मत व्यक्त करत असतात. अशातच प्रकाश राज यांनी आज लोकसभेतील दुसऱ्या टप्प्यात बंगळुरुमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी मतदान केल्यानंतर प्रकाश यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांचं म्हणणं मांडलं.
प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियाव एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ते सांगतात की, "मी माझं मत दिलंय. माझं मत एक बदल आणण्यासाठी महत्वाचं आहे. मी द्वेषाविरोधात मत दिलंय. जो संसदेत सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करुन त्यांचा आवाज बुलंद करु शकेल, अशा व्यक्तीला माझं मत मी दिलंय. तुम्ही सर्व जा आणि मतदान करा. यामुळे बदल होईल. तुम्हा सर्वांना खुप प्रेम."
सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 89 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे. राहूल द्रवीड, सुधा मुर्तींपासून अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.