Join us

'आवाज उठवला नाही तर ते उद्या देशही तोडतील', अभिनेते प्रकाश राज यांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 1:26 PM

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधणारे अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे.

मुंबई-

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधणारे अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये महानरपालिकेकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाईला अनुसरुन प्रकाश राज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना प्रकाश राज यांनी भाजपावर नाव न घेता टीका केली असून जर कुणी आवाज उठवला नाही तर लवकरच देशही तोडला जाईल, असा घणाघात प्रकाश राज यांनी केला आहे. 

"पुतळ्यांची उभारणी...घरांवर कारवाई...आता जर आपण आवाज उठवला नाही, तर ते लवकरच देशही तोडतील", असं ट्विट प्रकाश राज यांनी केलं आहे. 

प्रकाश राज हे दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते असून त्यांनी बॉलीवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ते नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपलं रोखठोक मत व्यक्त करत असतात. यात त्यांनी आजवर अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. 

प्रकाश राज यांनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील सुरुवात १९९८ साली हिटलर या चित्रपटातून केली होती. पण त्यांनी 'वॉण्टेड' या बॉलिवूड चित्रपटातून घनी भाईच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी इंद्रप्रस्थम, बन्धनम, व्हीआयपी, नंदनी, शांती शांती, वन्नावली, आजाद, गीता, ऋषी, दोस्त, सिंघम, वॉण्टेड, बुढ्ढा होगा तेरा बाप, हीरोपंती एन्टरटेन्मेंट, मुरारी, इंद्रा, इडियट, शक्ती द पावर, फूल्स, गंगोत्री, स्मार्ट द चॅलेंज, पोकरी, राणा, लायन आणि रुद्रमादेवी सारख्या लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :प्रकाश राजनरेंद्र मोदी