प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. विविध सिनेमांमधून छाप पाडत प्रसादने स्वतःचं अस्तित्व मराठी मनोरंजन सृष्टीत निर्माण केलं. प्रसाद ओकने २०२२ साली आलेल्या 'धर्मवीर' सिनेमामधून आनंद दिघेंची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली. आता प्रसाद मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवायला तयार आहे. प्रसाद ओकचा आगामी हिंदी सिनेमा 'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर भेटीला आलाय.
'ब्लॅकआऊट'चा ट्रेलर रिलीज
प्रसाद ओकचा आगामी हिंदी सिनेमाचं नाव आहे 'ब्लॅकआऊट'. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर नुकतंच 'ब्लॅकआऊट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की विक्रांत मेस्सीचा अपघात होतो. पुढे विक्रांतला त्याच वेळी सोन्याचे दागिने आणि पैशांनी भरलेली गाडी भेटते. हा सर्व ऐवज गोळा करुन विक्रांंत पळून जातो. तोच वाटेत त्याला सहप्रवासी भेटतात. पुढे मग सर्वांपासून लपतछपत विक्रांत वेगळ्याच फंदात सापडतो. ट्रेलरमध्ये प्रसाद ओक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय.
'ब्लॅकआऊट' कधी होतोय रिलीज?
'ब्लॅकआऊट'मध्ये प्रसाद ओकसोबतच मौनी रॉय, विक्रांत मेस्सी, करण सोनावणे, सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसत आहेत. प्रसाद ओकच्या भूमिकेची छोटीशी झलक पाहून त्याचे फॅन्स खूश झाले आहेत. 'ब्लॅकआऊट' हा सिनेमा ७ जूनला जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. प्रसाद ओक सध्या 'धर्मवीर २' सिनेमाचंही शूटींग करत असून हा सिनेमा याचवर्षी २०२४ च्या अखेरीस भेटीला येण्याची शक्यता आहे.