मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक अभिनयाबरोबरच त्याच्या स्वभावासाठीही ओळखला जातो. प्रसादने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्रात मराठी सिनेमांना प्राइम शो मिळण्याबाबत भाष्य केलं. मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी शिंदे सरकार उतरवेल, असंदेखील प्रसाद या मुलाखतीत म्हणाला.
प्रसादने कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्याला "मराठी सिनेमा हिंदी सिनेमांशी स्पर्धा का करू शकत नाही?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत प्रसादने स्पष्ट भाषेत त्याचं मत मांडलं. "मराठी सिनेमा स्पर्धा करत नाही असं नाही. हिरकणी सिनेमासमोर मेड इन चायना, सांड की आँख, हाऊसफुल ४ हे हिंदी सिनेमे होते. पण, हे सिनेमे पडले आणि हिरकणी सुपरहिट चालला. २९ एप्रिलला चंद्रमुखी, १३ मेला धर्मवीर आणि २८ मेला हंबीरराव...लागोपाठ मराठीतले ३ सुपरहिट आणि मोठे सिनेमे आले. आणि त्यांच्यासमोर हिंदीतला एकही सिनेमा चालला नाही," असं प्रसाद म्हणाला.
पुढे तो म्हणाला, "मुद्दा असा आहे की मराठीतील छोट्या चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये. आणि ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. याबद्दल अनेकदा बोललं गेलं आहे. राजसाहेब ठाकरेंनी खळखट्याकसारखं आंदोलन केलं. राजसाहेब वारंवार मराठी सिनेसृष्टीसाठी धावून आले आहेत. पण, तरीसुद्धा वारंवार येणारं सरकार त्यावर ठोस पावलं उचलत नाहीये, हेतेखील तितकंच खरं आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळालाच पाहिजे. हा आमचा हक्क आहे. त्यासाठी भीक मागण्याची वेळ येता कामा नये, हे उघड सत्य आहे. याकडे सरकारचं लक्ष गेलं पाहिजे. आणि फायनल तोडगाही निघाला पाहिजे."
"हिंदी सिनेमांमुळे जास्त कलेक्शन मिळत असल्यामुळे त्या सिनेमांना प्राइम टाइमचे शो दिले जातात. ही मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी आहे. हा त्यांचा माज आहे. आणि एक दिवस हा माज नक्की उतरेल. कोणीतरी त्यांचा हा माज उतरवेल. आशा करतो की शिंदे सरकारच त्यांचा हा माज उतरवेल. पण, प्राइम शोसाठी वारंवार भीक मागायला लागते, हे चित्र चांगलं नाही. हे बदलायला हवं," असंही त्याने पुढे सांगितलं.