रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा सध्या चर्चेत आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर या सिनेमाचीही सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक मराठी कलाकारांनीही या सिनेमाचं कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत. आता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमासाठी प्रसाद ओकने पोस्ट केली आहे.
प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम करण्याबरोबरच त्याने काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. प्रसाद ओकने नुकतंच स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रसाद ओक थक्क झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. "'स्वातंत्र्यवीर सावरकर' अप्रतिम चित्रपट…!!! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी. अतिशय संयत अभिनय. उत्तम पटकथा. देखणं छायाचित्रण. परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन…!!!", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे प्रसाद म्हणतो, "चित्रपट आता मराठीत सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा “सावरकरांना” त्रिवार वंदन…!!!! जय हिंद…!!!".
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा २२ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. हिंदी सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहून हा सिनेमा मराठीतही प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या सिनेमाने ९ दिवसांत जगभरात १८ कोटींचा गल्ला जमवला आहे.