मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं हे एका लग्नाची गोष्ट या नाटकातील गाणे त्या काळात प्रचंड गाजले होते. अभिनेता प्रशांत दामले यांची ‘गायक’ प्रशांत दामले अशी एक वेगळी ओळख आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात त्यांनी गायलेले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द रसिकांच्या ओठावर आजही येतात. हे गाणे प्रेक्षकांना मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील ऐकायला मिळाले होते. आता या गाण्याचा एक छानसा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीस आला असून प्रशांत दामले यांनी तो सोशल मीडियाच्या द्वारे शेअर केला आहे.
प्रशांत दामले यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग द्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून यात आपल्याला प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर यांना पाहायला मिळत आहे. कविता लाड आणि प्रशांत दामले यांच्या जोडीचे एका लग्नाची गोष्ट हे नाटक चांगलेच गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जोडीसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक १७ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याच नाटकाच्या निमित्ताने हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रशांत दामले यांनी लिहिले आहे की, बरेच लोक आजही भेटतात आणि या गाण्याविषयी सांगतात. पण लक्षात येते की, तब्बल २० वर्ष झाली या गाण्याला... एका लग्नाची पुढची गोष्टच्या निमित्ताने हे गाणे एका नव्या रूपात घेऊन येतोय.
प्रशांत दामले यांनी हे गाणे सोशल मीडियाला शेअर केल्यापासून मोठ्या संख्येने त्यांचे फॅन्स हे गाणे पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत. एवढेच नव्हे तर हे गाणे त्यांना कसे वाटले हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.