प्रशांत दामले (Prashant Damle) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक सिनेमे, मालिका आणि अनेक गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत दामले प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एक दिग्गज नाट्य निर्माते अशीही त्यांची एक ओळख आहे. तूर्तास प्रशांत दामले यांची एक पोस्ट चर्चेत आहे. होय, एक व्यथा मांडणारी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.
‘माझी व्यस्था’ असं शीर्षक त्यांनी या पोस्टला दिलं आहे. यात ते लिहितात,‘नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात अस झालय.. सगळं पूर्ववत होऊदे बाबा लवकर...’, अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी शेअर केली आहे.
प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘मराठीत फॅन क्लब ही संकल्पना तुमच्यामुळे सुरू झाली. प्रेक्षक आणि तुमच्यात कधीही भिंत उभी नसे. आज कोव्हिडने अंतर वाढवलं, तरी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे,’अशी कमेंट त्यांच्या एका चाहत्याने केली आहे.
1983 मध्ये ‘टुरटुर’ नाटकाद्वारे प्रशांत यांच्या व्यावसायिक नाटय कारकिर्दीला सुरुवात झाली. तीन दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीची सेवा केलेल्या प्रशांत यांना त्या रंगभूमीने आणि प्रेक्षकांनी भरभरुन दिले. मोरुची मावशी, गेला माधव कुणीकडे, पाहुणा, चल काहीतरीच काय, प्रितीसंगम, लग्नाची बेडी, ब्रह्मचारी, एका लग्नाची गोष्ट, सुंदर मी होणार, चार दिवस प्रेमाचे, लेकुरे उदंड झाली, बे दुणे पाच, जादू तेरी नजर, आम्ही दोघं राजा राणी, ओळख ना पाळख, बहुरूपी, श्री तशी सौ, सासू माझी ढासू, माझिया भाऊजींना रीत कळेना,संशयकल्लोळ साखर खाल्लेला माणूस आणि कार्टी काळजात घुसली या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.