Join us

प्रशांत दामलेंचा 'माधव' रंगभूमीवर परत येतोय; ६३व्या वर्षी करणार ६३ प्रयोग

By संजय घावरे | Published: May 27, 2024 7:17 PM

१९ वर्षांनी पुन्हा रसिकांसमोर येणार 'गेला माधव कुणीकडे'

मुंबई - ‘अरे हाय काय अन् नाय काय...' असे म्हणत रसिकांना वेड लावणारा प्रशांत दामलेंच्या नाटकातील 'माधव' पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे. २००५मध्ये रसिकांची रजा घेतलेले 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक दामले पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. या नाटकाचे फक्त ६३ प्रयोग होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

एक तपाहून अधिक काळ रसिकांचे यशस्वी मनोरंजन करणारे प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडगोळीचे 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक १९ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. नाटकातील प्रशांत-विनयच्या अफलातून टायमिंगवर रसिक फुल टू फिदा झाले होते. यातील दामलेंचा 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलॉग आजही चांगलाच पॉप्युलर आहे. ७ डिसेंबर १९९२ रोजी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे १८०२ प्रयोग झाले आहेत.

मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा, पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४ वाजता होणार आहे. याची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रशांत-विनयसोबत नीता पेंडसे, अक्षता नाईक, तन्वी पालव आणि राजसिंग देशमुख हे नाटकातील कलाकार उपस्थित होते.

यावेळी दामले म्हणाले की, जुन्या पिढीतील अतिशय गाजलेले 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक आजच्या पिढीतील रसिकांना रंगमंचावर पाहता यावे यासाठी पुनरुज्जीवित करत आहोत. हे नाटक माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. इतक्या वर्षांनी पुन्हा या नाटकाची तालिम करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. हे नाटक एक वेगळीच उर्जा देणारे असल्याने पुन्हा एकदा तालिम करताना नवीन उर्जा मिळाली आहे.

वसंत सबनीसांनी लिहिलेल्या या नाटकात एकही शब्द बदललेला नाही. कालावधीही पावणे तीन तासांचाच असेल असे दामले म्हणाले. याखेरीज 'हाय काय अन् नाय काय' या संवादामागील गंमतही दामले यांनी सांगितली. विनय यांनी पूर्वी नाटकाचे प्रयोग करताना घडलेल्या गंमतीजंमती सांगितल्या, तसेच वर्तमान काळात अशा प्रकारचे नाटकांचे लेखन करणारे लेखक नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशांत-विनय या जोडीने नाटकातील एक प्रसंग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सादर केला.

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. आता हिच मेजवानी पुन्हा रसिकांसमोर येणार आहे. या नाटकाची प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत यांचे असून, नेपथ्य मधुकर बाड यांचे आहे.

टॅग्स :प्रशांत दामले