Join us

'घानिष्ठ मैत्रीला आज पूर्ण विराम मिळाला'; जड अंत:करणाने प्रशांत दामलेंनी दिला प्रदीप पटवर्धन यांना अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:05 PM

Prashant Damle: प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धन (pradeep patwardhan)यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.  ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘एक दोन तीन चार’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ चित्रपट नव्हे तर नाटक, मालिकाही त्यांनी गाजवल्या. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहत आहेत. यामध्येच अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle) यांनीही जड अंत:करणाने आपल्या मित्राला निरोप दिला आहे.

"पट्या... प्रदीप पटवर्धन...मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या...सिद्धार्थ कॉलेजची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्रीला आज पूर्ण विराम मिळाला. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार", अशी भावुक पोस्ट प्रशांत दामले यांनी लिहिली आहे.

 

दरम्यान, प्रशांत दामले यांच्या या पोस्टवरुन त्यांची आणि प्रदीप पटवर्धन यांची किती घट्ट मैत्री होती याचा अंदाज लावता येतो. प्रदीप पटवर्धन आणि प्रशांत दामले यांनी अनेक चित्रपट, नाटकांमध्ये एकत्र काम केलं होतं. 

टॅग्स :प्रशांत दामलेसेलिब्रिटीसिनेमा