गेल्या कित्येक वर्षांपासून रंगमंच गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रशांत दामले (prashant damle). आजवरच्या कारकिर्दीत प्रशांत दामले यांची अनेक नाटकं सुपरहिट ठरली आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या नाटकाला प्रेक्षक तुडूंब गर्दी करतात. त्यामुळे त्यांच्यावर, त्यांच्या अभिनयावर प्रेम करणारे अनेक रसिक प्रेक्षक यावेळी पाहायला मिळतात. मात्र, एकेकाळी चक्क एका प्रेक्षकाने दामलेंचं नाटकं अर्ध्यावर सोडलं. इतकंच नाही तर, नाटक मध्यावर सोडून जाण्यापूर्वी त्यांनी दामलेंच्या नावाने एक पत्रदेखील लिहिलं.
सध्या सोशल मीडियावर प्रशांत दामले यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. 'दामले हे नाटक तुमच्या लायकीचं नाही', असं म्हणत हा प्रेक्षक निघून गेले. हा किस्सा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात घडला होता.
बालगंधर्वमधील प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर तिकीट तपासणाऱ्या व्यक्तीने दामलेंना ४ स्टेपल लावलेली तिकीटं आणून दिली. ही तिकीट एका कुटुंबाची होती आणि त्यांनी तब्बल१६०० रुपयांना खरेदी केली होती. विशेष म्हणजे नाटक न आवडल्यामुळे या कुटुंबाने तिकीट फाडून ती दामलेंना परत करायला लावली होती.सोबतच एक निरोपही लिहिला होता.
“दामले हे नाटक तुमच्या लायकीचं नाही. आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला आमच्या तिकीटाचे पैसे परत नकोयेत. पण, आम्ही मध्यांतरानंतरचं नाटक सोडून जात आहोत, असं त्या पत्रात लिहिलं होतं. दरम्यान, हे पत्र हातात पडल्यानंतर आपण एक नवीन धडा शिकलो, असं प्रशांत दामले यांनी या मुलाखतीत सांगितलं.