मराठी नाट्यसृष्टीतील प्रतिष्ठित समजला जाणारा असा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी नाट्य प्रयोगांचे विक्रम रचणारे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना यंदा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिवस असून याच दिवशी प्रशांत दामलेंना पुरस्कार दिला जाणार आहे. नुकतंच त्यांनी तब्बल १२५०० प्रयोगांचा विक्रम नावावर केला. तीन अनेक दशकांपासून ते आपल्या नाटकांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
प्रशांत दामले म्हणजे मराठी नाटकांचे बादशाहच. त्यांचं एखादं नाटक आहे आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला नाही असं क्वचितच होईल. त्यामुळे विष्णुदास भावे गौरवपदकासाठी त्यांचं नाव आधी येतं. नुकतंच त्यांनी १२५०० ना प्रयोग केला आणि ही प्रयोगांची मालिका अजूनही सुरुच आहे. त्यांच्यासाठी रंगभूमी म्हणजे दुसरं घरच आहे. त्यामुळे याच रंगभूमीदिवशी विष्णुदास भावे गौरव पदकाने त्यांचा सम्मान करण्यात येणार आहे. गौरवपदक, २५ हजार रोख, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरुप आहे. सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
प्रशांत दामले सध्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत. तसंच त्यांनी निर्मित केलेलं संकर्षण कऱ्हाडेचं 'नियम व अटी लागू' ही हाऊसफुल सुरु आहे. या दोन्ही नाटकांचे परदेशातही जोरदार प्रयोग झालेत.