मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सध्या माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत तिने साकारलेली नेहा रसिकांना खूप भावते आहे. तसेच प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते आणि पोस्टमुळे ती चर्चेत असते. दरम्यान तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिने व्हिडीओ शेअर करत तिचा नवरा अभिषेक जावकर(Abhishek Jawkar)ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर अभिषेक जावकर सोबतचे काही खास क्षणांचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आनंदी ५. या व्हिडीओत प्रार्थना अभिषेकसमोर नाचताना दिसते आहे. तसेच मस्ती करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटी शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रार्थना नेहमी अभिषेकसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
प्रार्थना बेहरे हिने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज असून तिने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.