मानाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत विविध पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या ‘प्रवास’ या मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सातव्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘प्रवास’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा व सर्वोत्तम दिग्दर्शकीय पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. महोत्सवात समाविष्ट झालेल्या विविध राज्यांतील अनेक चित्रपटांमधून ‘प्रवास’ला हा पुरस्कार मिळाला आहे.
जोधपूरच्या प्रसिद्ध मेहरानगड किल्ल्यात संपन्न झालेल्या रंगतदार सोहळ्यात ‘प्रवास’ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ व शशांक उदापूरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. यासोबत ‘प्रवास’ची ‘इफ्फी 2020’ मध्ये निवड झाल्याबद्दल चित्रपटाचे निर्माते ओम छांगाणी यांना ‘प्राईड ऑंफ राजस्थान’ (PRIDE OF RAJASTHAN) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘प्रवास’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगने महोत्सवाची सांगता झाली तेव्हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट हा क्षण सुद्धा कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हता, अशी भावना दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी व्यक्त केली.
या पुरस्काराबरोबरच केरळ येथील त्रिच्चूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसुद्धा ‘प्रवास’ चित्रपटाची निवड झाली आहे. ‘प्रवास’ वर होणारा पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला समाधान देणारा असल्याची भावना निर्माते ओम छांगाणी यांनी बोलून दाखवली. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ चित्रपटामध्ये अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले, श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.