'प्रेमाची गोष्ट' या स्टार प्रवाहवरील सर्वांच्याच लाडक्या मालिकेने नुकताच एक धक्का दिला. या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या तेजश्री प्रधानलाच रिप्लेस करण्यात आलं. सागर-मुक्ताची केमिस्ट्री खूप गाजली होती. आता तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) आली आहे. मकर संक्रांतीनिमित्त नुकताच स्टार प्रवाहचा इव्हेंट झाला. यामध्ये सागरसोबत नवी मुक्ता आली होती. लोकमत फिल्मीशी त्यांनी संवाद साधला.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) हा सागरच्या भूमिकेत आहे. तर स्वरदा आता मुक्ताच्या भूमिकेत आहे. मुक्ता हे पात्र साकारण्यासाठी स्वरदा किती उत्सुक आहे, मनात धाकधूक आहे का, रिप्लेसमेंटची भीती वाटते का असा प्रश्न तिला विचारण्यात आला. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत स्वरदा म्हणाली, "धाकधूक आहेच. पहिल्यांदा मी ऑनस्क्रीन आईचं पात्र साकारत आहे. पहिल्यांदा आईच्या भूमिकेत दिसणं हे आव्हानात्मक आहे. माझ्यावर चॅनेलने विश्वास टाकला त्यासाठी त्यांचेही आभार. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. प्रेक्षक मायबाप कधीही निराश करत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे. मला रिप्लेसमेंटची भीती वाटत नाही. कलाकार म्हणून एखाद्या शोचा भाग असणं, तो शो सोडणं हा प्रक्रियेचाच भाग आहे. आपण आपलं प्रामाणिकपणे काम करणं हेच खूप आहे."
नवीन मुक्तासोबत मैत्री झाली का? यावर राज हंचनाळे म्हणाला,"आमची आधी ओळख नव्हती. मालिकेच्या सेटवरच ओळख झाली. तिला सेटवर येऊन ३-४ दिवसच झालेत. त्यात जितकं शूट झालं खूप मजा आली. ती कोळी कुटुंबात लगेच सेट झाली आहे."
तेजश्रीला मिस करतो का? यावर तो म्हणाला, "नक्कीच मिस करतोय. पण जसं शाळा, कॉलेज संपतं आपला एखादा मित्र पुढच्या बॅचला जातो. तेव्हा आपल्याला आठवण येत राहते. पण प्रक्रिया पुढे चालतच राहते. शो मस्ट गो ऑन...त्यामुळे एन्जॉय करतोय. नवी मैत्री होतेय हा सर्व प्रक्रियेचा भाग आहे."
तेजश्री प्रधान मालिकेतून अचानक गेल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. तिच्या जागी नव्या मुक्ताला स्वीकारणं सुरुवातीला चाहत्यांना कठीण जाणार आहे. त्यामुळे आता स्वरदा त्यांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं आहे.