तेहसीन खान
बॉलिवूडची शांत, सोज्वळ, गोड स्मित असलेली अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. ‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भूमिकांच्या बाबतीत कायम नवनवे प्रयोग करत राहण्यातच ती धन्यता मानते. आता ती ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटामुळे चर्चेत आलीय. अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यासोबत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने तिने शेअर केलेला हा प्रवास...
* तू ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेस. तुला चित्रपटात मांडण्यात आलेला विषय किती रूचला?- माझा जन्म हिमाचल प्रदेशमधील. पुढे मी चंदीगढमध्ये मोठी झाले. त्यामुळे मी या सर्व समस्या अगदी जवळून पाहिल्या आहेत. सर्वसामान्यांचा हा प्रश्न असून तिथे प्रत्येक जण या हक्कांसाठी कायम लढत राहतो. आपण सर्वांनाच हे ठाऊक आहे की, एक सर्वसामान्य व्यक्ती किती मेहनतीने घर चालवतो? त्याच्या घरच्या लोकांना चार सुखाचे घास खाता यावेत म्हणून रात्रंदिवस कष्ट करतो. त्यापश्चात त्याला काय मिळते? तर त्याच्या हक्काची वीज देखील मिळत नाही. वीज मिळवण्यासाठीचा हा लढा या चित्रपटात मांडण्यात आला आहे. यात मला वकिलाची भूमिका करायला मिळाली, याचा खूप आनंद आहे. वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका मला करायला मिळाली याचे समाधान वाटतेय.
* तू आत्तापर्यंत मोठमोठया कलाकारांसोबत काम केलं आहेस पण, या चित्रपटात मात्र तूच मुख्य भूमिकेत दिसत आहेस. याचं कधी दडपण आलं का?- मला असं वाटतं की, मोठा रोल असणं यापेक्षाही त्याचं चित्रपटात किती महत्त्व आहे? याचा विचार व्हायला हवा. जर तुम्हाला एक कलाकार म्हणून एखादा रोल करायचा असेल तर तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टी करायलाच पाहिजेत त्याशिवाय योग्य गोष्टींचा पुरस्कार करायलाच हवा. मी टीमला जॉईन होण्याअगोदर आमच्या टीममधील बऱ्याच जणांनी त्यांच्या भूमिकांचे वेगवेगळे सीन्सचे शूटिंग पूर्ण केले होते. मी तशी टीमसोबत नवीनच होते पण, सर्वांनी मला सांभाळून घेतले.
* तू हृतिक रोशनसोबत काम केलं आहेस. काय शिकलीस तू त्याच्याकडून?- होय, हृतिक रोशनसोबत मी काम केलं आहे. त्यांच्याकडून मी हे शिकले की, प्रत्येक कलाकाराने आपल्या कामासोबत प्रामाणिक आणि साधेपणानं राहिलं पाहिजे. एखाद्याकडे नॉलेज असेल तर त्याने ते शेअर केले पाहिजे. त्याशिवाय तुमचे त्या व्यक्तीसोबतचे नाते कसे आहे? यावरही सर्व अवलंबून आहे.
* श्रद्धा कपूरसोबतची तुझी बाँण्डिंग कशी निर्माण झाली? कॅट फाईटची एकही बातमी आम्हाला मिळाली नाही. काय सांगशील?- श्रद्धा ही एक खूप चांगली मुलगी आहे. खरंतर, मी एक खूप आनंदी आणि समाधानी व्यक्ती आहे. मी जास्त प्रमाणात ताण सहन करू शकत नाही. माझ्या अवतीभोवतीही मी जास्त ताण असलेले लोक सहन करू शकत नाही. मला आनंदी राहायला आवडतं. मला चुकीच्या किंवा वाईट गोष्टींचा विचार करायला आवडत नाही.
* तुझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तू अत्यंत साध्या आणि डीग्लॅम अवतारात दिसत आहेस. मात्र, तू जेव्हा ‘बत्ती’च्या शूटिंगसाठी सेटवर आलीस तेव्हा तू आधीच ‘उरी’ साठी हेअरकट केले होतेस. काय सांगशील?- होय, मी ‘उरी’साठी अगोदरच केस कापले होते आणि माझे ‘बत्ती’चे शूटिंग बाकी होते. मग मी इन्स्टाग्रामवर माझ्या न्यू लूकचा फोटो पोस्ट केला. शाहिद ती पोस्ट बघून म्हणाला,‘आपल्या चित्रपटासाठीचा हा न्यू लूक आहे का? मी नाही म्हटले. कारण, बत्तीसाठी मला लांब केस हवे होते. मग शाहिदला लक्षात आलं आणि त्याने मग मला चांगली प्रतिक्रि या दिली. पण, शाहिद आणि श्रद्धा दोघेही माझा लूक बघून चक ीत झाले.
* सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांना जबाबदारी आणि संवेदनशीलपणे हाताळावे लागते असे तुला वाटते का?- अर्थात. संवेदनशीलता आणि वैधता तिथे असलीच पाहिजे. उरी हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून मला वाटतं की, आदित्य यांनी खरंच खूप चांगले काम केले आहे. त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून विकी कौशल हा अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स असे आहेत की ज्यामुळे एका कलाकाराच्याही पुढे जाऊन आपल्याला अनेक गोष्टींचा अभिमान वाटतो. उरीचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतोय.
* तुझी बहीण सुरिली देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे, काय सांगशील?- ती खरंच खूप अमेझिंग आहे. ती राजकुमार संतोषी यांच्या ‘बॅटल आॅफ सारागृही’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. डान्स, अॅक्टिंग यांनी पूर्ण असलेलं ती एक पॅके ज आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहे. आम्ही सॅलोन, चित्रपट, डान्स, डिनर यांना देखील सोबतच जातो. ती आणि मी एकत्र खूप धम्माल करतो.