Join us

मोदींचा चमचा असल्याचा अभिमान - पहलाज निहलानी

By admin | Published: June 09, 2016 11:33 AM

उडता पंजाब चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी मी मोदी चमचा असून मला त्याचा अभिमान आहे असं बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 09 - उडता पंजाब चित्रपटावरुन सुरु असलेला वाद थांबण्याचा नाव घेत नाही आहे. ना राजीनामा, ना माफी मागण्यास तयार असलेले सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अनुराग कश्यप यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला आहे. अनुराग कश्यपच्या 'उडता पंजाब' चित्रपटाला आम आदमी पक्षाने फंडिंग केल्याचा आरोप पहलाज निहलानी यांनी केला होता. ज्यानंतर बॉलिवूडमधून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. 
 
'मी केलेले आरोप सिद्ध करु शकत नाही. मी जे ऐकलं ते बोललो, मी माफी मागणार नाही', असं पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे. 'अनुराग कश्यप यांनी मी मोदींचा चमचा असल्याचं बोलले आहेत, हो मी आहे चमचा, आणि मला याचा अभिमान आहे. मग मी काय इटलीच्या पंतप्रधानांचा चमचा असायला हवं होतं का ?', असा उलटा सवाल पहलाज निहलानी यांनी विचारला आहे.
 
(भारतात सौदी अरेबिया सारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न : महेश भट्ट)
 
'उडता पंजाबसंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयावर केंद्राचा कोणताच प्रभाव नाही. केंद्र आमच्या कामात कधीच दखलअंदाजी करत नाही. कोणताच राजकीय प्रभाव आमच्यावर नाही', असं पहलाज निहलानी बोलले आहेत. उडता पंजाब चित्रपटाच्या शिर्षकातून पंजाब शब्द काढायला सांगितल्याचा आरोप निहलानी यांनी फेटाळला आहे. मात्र कोणते सीन्स कट करायला सांगितले आहेत याची माहिती देणं त्यांनी टाळलं. 
 
मोदींना चमच्यांची गरज नाही - रवीशंकर प्रसाद 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्याही चमच्याची वा खुशमस्क-याची गरज नसल्याचे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले असून त्यांच्या या वक्तव्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी तोंडघशी पडले आहेत. ' होय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चमचा असल्याचा मला अभिमान आहे,' असे वक्तव्य काल निहलानी यांनी केल होते. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. 'पंतप्रधानांनी स्वत:च आपण संपूर्ण देशाचे प्रधान सेवक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशाच्या प्रधान सेवकांनाकोणत्याही खुशमस्कऱ्याची गरज आहे, असे मला वाटत नाही' असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. तसेच सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दिग्दर्शक अनुराग कश्यपने नाराजी व्यक्त करताना, "मला नेहमी नवल वाटायचे की उत्तर कोरियामध्ये नागरिक कसे राहत असतील. पण मला आता विमान पकडायची गरज नाही. कारण इथे तेच अनुभवयास मिळत आहे," अशा संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'उडता पंजाब' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे, चित्रपटाच्या शीर्षकामधून पंजाब शब्द काढून टाका असा आदेश सेन्सॉर बोर्डाने दिला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या भुमिकेमुळे कदाचित चित्रपटाचे नावच बदलावे लागण्याची शक्यता आहे. चित्रपटातील ८९ दृश्यांवर कात्रीही फिरवण्यास सांगण्यात आलं आहे. . चित्रपट १७ जूनला रिलीज होणार असून याचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये पंजाबला ड्रगमुळे होणारा त्रास दाखवण्यात आला आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ‘इश्किया’, ‘देढ इश्किया’ हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत. चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग यांच्या प्रमुख भुमिका आहेत.