पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला अभिनेता कार्तिक आर्यनाचा व्हिडीओ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:18 AM
कार्तिकच्या या व्हिडीओचे सगळ्यांनीच कौतूक केले आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. कार्तिक आर्यनने कोरोना व्हायरस संदर्भात केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कार्तिकच्या या व्हिडिओचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदी यांनी कार्तिकचा हा व्हिडीओ आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मोदीने लिहिले आहे की, 'या तरुण अभिनेत्याला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे. हा जी वेळ आणि काळ सांगतोय तो जास्त सावधगिरी बाळगण्याची आहे आणि कोरोनाचा बिमोड करण्याची आहे.' कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत, लोकांनी जास्तीत जास्त संख्येने घरी थांबावे, घरूनच काम करावे. एकदा हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला की, त्याला आटोक्यात आणणे कठीण असल्याचे कार्तिक सांगताना दिसतो आहे. केवळ अडीज मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 179 देशांना विळखा घातला असून, 11267 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. रविवारी मोदींनी जनता कर्फ्यूची घोषणा केली असून, त्यानिमित्तानं देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.