Join us

Manushi Chhillar INTERVIEW: "प्लास्टिक सर्जरी वैयक्तिक गोष्ट, पण..."; विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा मोलाचा सल्ला! 

By मोरेश्वर येरम | Published: May 31, 2022 3:43 PM

चित्रपटाच्या सेटवरचा पहिला वहिला टेक, दिग्गज सहकलाकारांसोबतचा अनुभव, करिअर आणि सौंदर्याच्या परिभाषेत प्लास्टिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांना कितपत स्थान? अशा विविध विषयांवर मानुषीनं दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं. 

- मोरेश्वर येरम 

विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आता मानुषी छिल्लरचंही Manushi Chhillar नाव घेतलं जाणार आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'सम्राट पृ्थ्वीराज' या चित्रपटातून मानुषी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या सेटवरचा पहिला वहिला टेक, दिग्गज सहकलाकारांसोबतचा अनुभव, करिअर आणि सौंदर्याच्या परिभाषेत प्लास्टिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांना कितपत स्थान? अशा विविध विषयांवर मानुषीनं दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं. 

प्रश्न: चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याचे मनात होते का?मानुषी: "मी जेव्हा 'मिस वर्ल्ड' स्पर्धा करत होते त्याच काळात यशराज फिल्म काही चित्रपटांसाठीच्या कास्टींगसाठी शोध घेत होते. त्यावेळी मला 'पृथ्वीराज'साठी माझा विचार केला जातोय याची काहीच कल्पना मला नव्हती. माझंही इतरांप्रमाणेच ऑडिशन वगैरे सर्व प्रक्रिया झाली. ऑडिशननंतर मला थोडी कल्पना आली होती की एखादा ऐतिहासिकपट असणार आहे. मग पुढे जाऊन गोष्टी आणखी स्पष्ट झाल्या. जेव्हा मला कळालं की 'पृथ्वीराज'साठी माझा विचार सुरू आहे तेव्हा खरंतर खूप उत्सुकता निर्माण झाली. कारण त्या क्षणापर्यंत मी अभिनयात करिअर करण्याबाबत ठाम नव्हते. पुन्हा शिक्षणाकडे वळावं की काय अशा द्विधा मानसिकतेमध्ये मी होते. पण राजकुमारी संयोगितासाठी माझा विचार होत आहे हे कळाल्यानंतर माझे मतपरिवर्तन झाले. त्यामुळे अशा प्रकारची मोठी संधी जेव्हा तुमच्यासमोर येते तेव्हा तुम्हाला नक्कीच विचार करावा लागतो"  

प्रश्न: अनुभवी कलाकारांसोबत काम करताना भीती वाटली का?मानुषी: 'पृथ्वीराज' चित्रपटात अक्षय कुमार, सोनू सूद, आशुतोष राणा, संजय दत्त, मानव विज आणि साक्षी संवर या अनुभवी कलाकारांसोबत पहिल्यांदा काम करताना थोडी भीती वाटणारच पण आपण नवे आहोत हे स्क्रिनवर जाणवू न देण्याचं खरं आव्हान होतं. आपण नवखे आहोत असं दिसणं हे चित्रपटासाठीही चांगलं नव्हतं. त्यामुळे थोडी चिंता होती. पण त्यागोष्टीची भीती मला सेटवर कधीच जाणवली नाही किंबहुना ती जाणवू दिली गेली नाही. माझ्याकडे प्रशिक्षणासाठी खूप वेळही होता. खूप मेहनत घेतली आणि पूर्वतयारी पक्की केली. मला आजही पहिला टेक आठवतोय की पहिलाच सीन मला खूप मोठा देण्यात आला. माझा पहिला सीन शूट झाला याचा आनंद सेटवर साजरा करण्यात आला. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. माझ्या करिअरची सुरुवात असल्याची जाणीव सर्वांना सेटवर होती. त्यामुळे सर्वांनी सांभाळून घेतलं"

प्रश्न: ऐश्वर्या, दीपिका यांच्या आधीच्या भूमिकांनी मदत मिळाली का? मानुषी: ऐतिहासिक चित्रपटांमध्ये याआधी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन यांनी जोधा आणि दीपिकाने साकारलेली पद्मावती या दोन्ही जशा वेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे राजकुमारी संयोगिता देखील खूप वेगळी भूमिका आहे. चित्रपट एक दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यामुळे दिग्दर्शनाच्या दृष्टीकोनाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार करत असतो. ऐश्वर्यासारखी जोधाबाई इतर कुणी साकारली असती असं मला वाटत नाही. तसेच दीपिकाच्या बाबतीतही आहे. जेव्हा दुसऱ्याचं काम पाहाता तेव्हा तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. ज्यापद्धतीनं त्यांनी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांना त्या आवडल्या देखील. लोकांनी मला स्क्रीनवर राजकुमारी संयोगिता म्हणून स्वीकारावं हाच माझा प्रयत्न राहिला आहे.   

प्रश्न: प्लास्टिक सर्जरीमुळे २१ वर्षीय अभिनेत्राचा मृत्यू झाला यावर तुझं मत काय? मानुषी: लिपोसक्शन किंवा प्लास्टिक सर्जरीबाबतचा निर्णय घेणं ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. पण अशा एका सर्जरीनंतर एखाद्याचा मृत्यू होतो ही नक्कीच दु:खद घटना आहे. पण मी तीही गोष्ट बाजूला ठेवून एक सांगेन की कोणती सर्जरी करावी आणि करू नये हे प्रत्येक व्यक्तीच्या निवडीचा प्रश्न आहे. सुंदरता ही एक प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे आणि प्रत्येकाला स्वत:च्या दिसण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही जे करत आहात ते स्वत:साठी करा कुणी दुसरं सांगतंय म्हणून करू नका. तुमच्यापेक्षा कुणीतरी वरचढ आहे असं जीवनात आपल्याला नेहमीच वाटत राहणार आहे. ही गोष्ट कुठं एका ठिकाणी जाऊन थांबणारी नाही. एखाद्यानं सर्जरी करावी की करू नये याबाबतचा सल्ला देण्याचा मला अधिकार नाही.

प्रश्न: वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी तुला आहे. त्या दृष्टीकोनातून या विषयावर काय सांगशील? मानुषी: मला थोडीफार वैद्यकीय समज असल्यानं प्लास्टिक सर्जरी किंवा लिपोसक्शनबाबत मी एक गोष्ट सांगू शकते की आपल्या शरीराबाबत निर्णय घेताना आपण घेत असलेला निर्णय प्रचंड अभ्यासाअंती घ्यावा. चूक-बरोबर यात काहीच नाही. पण आपण कोणता निर्णय घेत आहोत याचा अभ्यास करावा, प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी. त्यात कोणते धोके आहेत किंवा नाहीत याची माहिती करुन घ्यावी. त्यानंतरच निर्णय घ्यावेत. 

टॅग्स :मानुषी छिल्लरपृथ्‍वीराजबॉलिवूडअक्षय कुमार