नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स' असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या या वेब सीरिजमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.
प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने चारचाँद लावले आहेत. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.
याबाबत प्रियाने सांगितले की, यापूर्वी मी केलेल्या भूमिकांपेक्षा 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील माझी व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. या मालिकेतील इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता. नागेश कुकुनूर हे उत्तम दिग्दर्शक आहेत. माझ्या भूमिकेच्या अंतरंगात खोलवर शिरण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा मला फार उपयोग झाला. माझी या सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.