गतवर्षी एका लहानशा व्हिडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर हिंदी सिनेमात डेब्यूसाठी तयार आहे. प्रिया प्रकाश लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. होय, आजच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला अन् टीजर प्रदर्शित होताच, हा चित्रपट वादात सापडला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस बजावले. खुद्द प्रशांत मंबुली यांनी याबाबतही माहिती दिली.
टीजर पाहिल्यानंतर प्रिया प्रकाशचा हा आगामी चित्रपट सुपरस्टार श्रीदेवी आणि त्यांच्या अपघाती मृत्यूवर आधारित असल्याचे कळते.या टीजरचा शेवटचा सीन विचलित करणारा आहे. शेवटी बाथटबमध्ये ज्या प्रकारे पाय दाखविण्यात आले आहेत, यावरुन हा चित्रपट श्रीदेवी यांच्याच आयुष्यावर आधारित असल्याचा अंदाज लावता येतो. पण या टीजरमध्ये श्रीदेवीला कुठला ट्रिब्युट देण्यात आला आहे, ना हा चित्रपट श्रीदेवींच्या आयुष्यावर आहे, याची कबुली देण्यात आली आहे. तूर्तास ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांनी बोनी कपूर यांच्याकडून कायदेशीर नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण हा चित्रपट श्रीदेवींच्या आयुष्यावर आधारित असल्याचा त्यांनी इन्कार केला आहे. माझा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. श्रीदेवी एक कॉमन नाव आहे. मी बोनी कपूर यांनाही हेच समजवण्याचा प्रयत्न केला. प्रिया प्रकाश यात एका अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. कायदेशीर नोटीसला काय उत्तर द्यायचे ते आम्ही बघू, असे मंबुली यांनी म्हटले आहे.दरम्यान प्रिया प्रकाशच्या वडिलांनी कायदेशीर नोटीसबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. हा आमचा नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.एकंदर काय तर प्रिया प्रकाशचा बॉलिवूड डेब्यूचं वादात सापडला आहे. आता हा वाद पुढे काय वळण घेतो, ते बघूच.