सध्या संपूर्ण जगात ज्या लग्नाची चर्चा आहे ते म्हणजे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचं (Radhika Merchant) लग्न. उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज लग्नबंधनात अडकतोय. गेल्या काही महिन्यांपासून अंबानी आणि मर्चंट कुटुंबाचे अनेक प्री वेडिंग सोहळे झाले. रोज केवळ यांच्याच सोहळ्याची चर्चा होती. आज अखेर हे लग्न होत आहे. मुंबईतील बीकेसी येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कालच या लग्नसोहळ्यासाठी अमेरिकेवरून पती निक जोनाससह मुंबईत पोहोचली. तिची झलक पाहून चाहत्यांनीही तिचं भारतात स्वागत केलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याला आज लाखो पाहुणे हजेरी लावणार आहेत. अनेक क्षेत्रातील दिग्गज या सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर परदेशातूनही बरीच मंडळी आली आहेत. सर्वांची लाडकी 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राही काल मुंबईत पोहोचली. भर पावसातही तिने पती निक जोनाससोबत पापाराझींना पोज दिली. यानंतर आलिशान कारमध्ये बसून कपल रवाना झालं. देसी गर्लचा ऑरा पाहून उपस्थित सर्वच कौतुकाने तिच्याकडे पाहत होते. आज अनंत-राधिकाच्या लग्नात प्रियंकाचा लूक कसा असणार याची अनेकांना उत्सुकता आहे.
इतकंच नाही तर या लग्नसोहळ्यासाठी हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनही तिच्या बहिणीसह आली आहे. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये किमने एन्ट्री घेतली. कार्दाशियन बहिणीही आल्याचं पाहून अंबानी कुटुंबाची जाम पॉवर असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
आज बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सातफेरे घेतील. एवढंच नाही उद्या आणि परवा म्हणजेच १३ आणि १४ जुलै रोजीही लग्नानंतरचे काही विधी असणार आहेत. आज सर्वांनाच भारतीय पारंपरिक ड्रेस कोड देण्यात आला आहे.