बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा (priyanka chopra). २००० साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिचा चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळे आज ग्लोबल स्टार म्हणून ती ओळखली जाते. परंतु, या देसी गर्लला इंडस्ट्रीत करिअर करायचं नव्हतं. विशेष म्हणजे तिला पहिला सिनेमा ऑफर झाला त्यावेळी चक्क ती रडायला लागली होती.
२००२ मध्ये प्रियांकाने कलाविश्वात पदार्पण केलं. Thamizhan या साऊथ सिनेमातून तिने इंडस्ट्रीत एन्ट्री केली. परंतु, या सिनेमासाठी ती सिलेक्ट झाल्यानंतर खूप रडली होती. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी याविषयी खुलासा केला.
"प्रियांकाला सिनेमात काम करायचं नव्हतं. कोणा व्यक्तीच्या माध्यमातून तिला पहिला साऊथ सिनेमा मिळाला होता. ज्यावेळी मी तिला या सिनेमाविषयी सांगितलं. त्यावेळी ती धायमोकलून रडली होती. मला हा सिनेमा करायचा नाहीये, असं तिने मला सांगितलं होतं. पण, प्रियांका लहानपणापासून आज्ञाधारी मुलगी होती. त्यामुळे मी तिला या सिनेमाची ऑफर स्वीकारायला सांगितलं त्यावेळी तिने माझं ऐकलं आणि तो सिनेमा साईन केला", असं मधू चोप्रा यांनी सांगितलं.
पुढे त्या म्हणतात, "ज्यावेळी तिने प्रत्यक्षात सिनेमाचं चित्रीकरण सुरु केलं त्यावेळी तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. साऊथची भाषा समजत नसतांनाही ती हे सगळं एन्जॉय करायला लागली होती. सिनेमाच्या टीमने तिला खूप मदत केली आणि सांभाळून घेतलं. अभिनेता विजय या सिनेमात लीड रोलमध्ये होते. प्रियांका डान्स करण्यात उत्तम होती. मात्र, विजयसोबतच्या डान्स स्टेप तिला मॅच करता येत नव्हत्या. त्यामुळे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोरिओग्राफरसोबत बसून डान्स प्रॅक्टीस करायची. या सगळ्या प्रवासानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला."
दरम्यान, प्रियांका अलिकडेच लव अगेन या सिनेमात झळकली होती. त्यानंतर आता ती Heads of State या सिनेमात झळकणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे.