बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता तर प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचे आयुष्य किती बदलते, ती अमेरिकेत स्थायिक होते की बॉलिवूडशी जुळलेली नाळ कायम ठेवत, भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी राहणे पसंत करते, या प्रश्नांची उत्तरे आपल्या येत्या काळात मिळतीलच. तूर्तास एक ताजी बातमी म्हणजे, लग्नानंतर प्रियांका लगेच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार आहे. होय, भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते. प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. खरे तर सुमारे वर्षभरापूर्वी या चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या चित्रपटासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती. त्यानंतर प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याचीही बातमी आली होती.