अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडबाबत एक धक्कादायक विधान केले होते. प्रियंकाला बॉलिवूडमधील काही लोकांकडून कॉर्नर केले जात होsते असा खुलासा तिने केला. हा गौप्यस्फोट केल्यानंतर नुकतीच ती भारतात परतली. नीता अंबानींच्या कल्चरल इव्हेंटमध्ये तिने हजेरी लावली. यावेळी करण जोहर आणि तिची गळाभेट झाल्याचा व्हिडिओही समोर आला. त्यामुळे प्रियंका चोप्रा सगळं विसरली की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला. आता नुकतेच प्रियंकाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबईत आयोजित एका प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रियंकाने हजेरी लावली. सध्या ती भारतात तिची हॉलिवूड फिल्म 'सिटाडेल'चं प्रमोशन करत आहे. कोस्टार रिचर्ड मेडनससोबत तिने प्रेस कॉन्फरन्सला संबोधित केले. यावेळी ती म्हणाली,'मला जे लोक आवडत नाहीत त्यांच्यासोबत मी आता काम करत नाही. याबाबतीत मी जराही तडजोड करणार नाही. जे लोक माझ्या भोवताली आहेत त्यांचाच मला आदर आहे. त्यांच्या बरोबर मला काम करायचं आहे. बऱ्याच काळापासून मी हे करत आहे. मला कामवर जाताना उत्साह वाटला पाहिजे. ज्यांच्यासोबत मला काम करायचे आहे त्यांना भेटायला जाताना मी नोट्स लिहिते.' आता असं बोलून प्रियांकाचा रोख नेमका कुणाकडे आहे याचा अंदाज येतो.
प्रियांका पुढे म्हणाली, 'मी आयुष्यात आता अशा स्टेजवर आले आहे जिथे मी खुलेपणाने बोलू शकते.तो आत्मविश्वास आता माझ्यामध्ये आहे. मी आता ते विसरले आहे आणि माझ्या आयुष्यात एक शांतता आली आहे. परत मला ते आठवत बसायचं नाही. मी आयुष्यात पुढे गेले आहे.'
प्रियांका काही दिवस भारतात असून तिच्यासोबत लेक मालती मेरी देखील पहिल्यांदाच भारतात आली आहे. चिमुकल्या मालती मेरीची झलक पाहून चाहते खूश झालेत. तसंच सध्या प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.